माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Thursday 20 September 2012

निबंध

         अगदी शाळे पासून माझा आवडता प्रकार. मराठीच्या पेपर साठी बाकी तयारी सगळी करावी लागायची पण निबंधाची तयारी फार कधी करावीच लागली नाही. बाकी पेपर आठवून आठवून लिहायचे मी पण निबंधाची वेळ आली कि मी माझ्याच विश्वात!!!! त्यातही माझा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे "आत्मवृत्त" अगदी कश्याच पण आत्मवृत्त लिहिणे म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ!!! 
          फुशारक्या नाही मारत, मार्क पण मिळायचे!! माझी आणि निबंधाची गट्टी कधी जमली असा विचार करायला गेले तर ऋणानुबंध जुना असल्याचं लक्षात आलं. घरी आई-बाबांनी वाचनाची आवड लावली, काही नाही तरी माणसाने रोजचा पेपर तरी वाचायला हवा असं त्यांचं धोरण. "अगं शब्दसंग्रह वाढतो , वाक्यरचना सुधारते" ह्या वाक्याचा अर्थ तेव्हा समजला नवता. पण चांगली गोष्ट हि कि मी शहाण्या मुली सारखं ऐकलं आणि फायदाच झाला.  मग एका मागून एक पुस्तकं माझ्या संग्रही आली आणि माझी मैत्री झाली त्यांच्याशी. हि पुस्तकं खरोखर तुम्हाला एका वेगळ्या विश्वात  नेतात , कल्पनाशक्ती नावाची जी hidden power आपल्यात असते ती जागृत करतात. पण एक पुस्तक एकदाच वाचू शकते मी, परत परत त्या विश्वात मला जायला आवडत नाही. मग वाटू लागल कि एकदाच काय ती "सफर" घडवणारी हि माझी दोस्त मंडळी काही फार उपयोगी पडत नाहीयेत. हि
कथा मी  अगदी  चौथी पाचवीत असतांनाची, त्या नंतर कदाचित हे "निबंध" महाशय आमच्या परिचयात आले.
          पहिला निबंध वगरे काही मला आठवत नाही पण चौथीच्या scholorship च्या पुस्तकातल्या म्हणी आणि वाक्प्रचार वापरून लिहिला होता मी तो. आम्हाला निबंधाची वही मिळायची घरी, बाई शाळेत विषय द्याच्या आणि घरी लिहायला सांगायच्या. हा programme बहुतेक रविवारी होत असावा कारण मी नंतर घरी सगळ्यांचं डोकं खात असे; अगदी पाहुणे जरी आले असतील तर त्यांना सुद्धा सोडत नसे,  मी "कित्ती" अभ्यासू आहे हे दाखवण्याचा हा माझा फंडा होता.  पण माझा निबंध चांगला जमत असावा कारण शेरा सुद्धा "छान" चा मिळायचा.
         पुढे निबंध पेपरात मार्कांचं लेणं ल्यावून आला आणि जास्तच भाव खावू लागला, मग खास त्यासाठी पुस्तकं वगरे मी धुंडाळू लागले, इतर पुस्तकं माझ्या गाठी जमा होत होती. आत्ता वाटू लागलं कि लहानपणचे पुस्तक मित्र अजूनही डोक्यात घर करू आहेत, कधीतरी त्यातली एखादी छोटी गोष्ट किंव्वा प्रसंग आठवायचा आणि लिहितांना मदत करायचा.  खरोखर मार्कांच्या चौकटीत आपला निबंध कसा बसेल? वगरे विचार करून मी निबंध लिहू लागले. थोडीफार चौकट साधली सुद्धा!!!
          पण मग त्यातही आपली काही खास आवड निवड आहे असं जाणवू लागलं, असं नको तसं लिहावं, हे नको तेच लिहावं वगैरे. मला जर कुणी फक्त निबंधा वरच परीक्षा आहे असं सांगितलं असतं न तर ती परीक्षा मी निक्षून दिली असती!!!!
           काही दिवसांनी माझी ओळख झाली ती निबंध स्पर्धा नावाच्या मला भाग घ्याव्या वाटणाऱ्या स्पर्धेशी. कारण काये कि मला मुळात स्पर्धा वगरे काही आवडत नाही, त्यात त्या असायच्या चित्रकला, गायन वगरे माझ्या सुप्त गुणांच्या, माझी आपली धडपड कि सुप्त गुण सुप्तच राहावे!!! उगाच प्रदर्शन कशाला? पण निबंध स्पर्धा हा माझा जिव्हाळ्याचा विषय बनला, शाळेत सुद्धा त्यात भाग घेतला, नाही म्हणायला उत्तेजनार्थ, तिसरा वगरे क्रमांक नशिबी आला पण आपल्या आवडीची गोष्टं करतोय ह्यातच समाधान!!!
          पुढे शिक्षण घेण्यासाठी मी R.Y.K. चं दार ठोठावलं, त्यांनी सुद्धा आनंदानी आत येऊ दिलं. इथे आम्ही Science चे विद्यार्थी असल्याने "ह्यांना काय साहित्याची समज?" असं  "गाढवाला गुळाची चव काय?" style मध्ये आमच्याकडे पहिलं  गेलं. पण मी बिचारी गरीब बापुडी इथे सुद्धा  निबंध स्पर्धेला जाऊन बसले, आणि पहिला वगरे मिळवला (हि बंडल नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी)
त्या स्पर्धे साठी खरच कष्ट घेतले होते. पण Science side घेतली आणि माझा माझ्या आवडत्या निबंध  प्रकाराशी  संबंध थोडा कमी झाला, संपलाच जवळ जवळ. मग M.Sc. मध्ये तर नावंच नाही.
          तरी एक किडा असतो तुमच्यात तो काही शांत बसू देत नाही सारखं वाटत होतं "लिहायचच नाही म्हणजे काय?" मग मला हा मार्ग सापडला आणि मी लिहिती झाले!!! आता तयारी नाही करत न कोणी तपासून मार्क देत पण मी लिहिते स्वतः साठी.
          मला आज निबंधाची आठवण का आली? मी शिकवत असलेल्या  कॉलेज मध्ये आज निबंध स्पर्धा आहे आणि मी स्पर्धा चालू असलेल्या वर्गात बसले आहे, निबंधाचा विचार करत!!! 

5 comments:

  1. Hey kharach ajvar jya jya nibandh spardhanmadhe bhag ghetala tya saglyanchi athvan jhali ha "nibandh" vachun. MAst! Keep It Up. :-)

    ReplyDelete
    Replies
    1. zali na? hetu sadhya zala maza. thank you for the comment...

      Delete
    2. Mast.. harshada!! chhan lihites.. asach continue kar..

      Delete
    3. Mast.. harshada!! chhan lihites.. asach continue kar..

      Delete
    4. hey nice to see ur comment...!!!
      Thank you...
      nakkich lihin....

      Delete