माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Saturday 4 June 2011

परिक्षा

       जवळपास एक महिना झाला काही लिहिलं नाही कारण, "परिक्षा". आता वाटतं आहे चला झाली एकदाची आणि  झालीच कायमची कारण आता ते tension नसणार, ती धावपळ नसणार माझं M.Sc. झालं आणि परिक्षा सुद्धा.
      थोडी nostalgic झालीये मी पण मग विचार केला कि माझ्या वयाच्या 
जवळपास सर्वच जणांना हे exam blues जाणवत असणार. आपल्या  
आयुष्याचा महत्वाचा भाग ज्यावर कितीही लिहिलं तरी ते कमीच.
      जर्रा आठवा आपली पहिली परिक्षा अगदी बालवाडीतली, जेंव्हा 
परीक्षेचा अर्थ सुद्धा कळत नव्हता आईनी घोटून घेतलेल्या त्या कविता,
गोष्टी, एक ते दहा अंक हे सगळं डोक्यात घेऊन आपण बाईंच्या समोर 
जात असू  आणि आठवलं तर आठवलं नाहीतर काहीतरी अचाट उत्तरं
देऊन "मी जाऊ?" म्हणून पळून येत असू . तरीही शेरा "पास". आज आपला result आहे म्हणजे काय हे सुद्धा नं कळणार  वय. फक्त आता 
सुट्टी लागणार आणि आपण आजी कडे जाणार हे माहिती असायचं.
      पुढे चौथीत पोहोचे परेंत scholarship नावाच्या प्रकारची परिक्षा असते 
आणि ती दिली तर "फार" फायदा होतो असं आपण कुणाकडून तरी 
ऐकलेलं असतं, मग आपण रडत कढत का होईना पण त्या परीक्षेला 
बसतो ( ह्यातल्या "आपण" ह्या सर्वनामा वर कुणाला आक्षेप असेल तर माफी असावी कारण माझी धारणा ह्या परीक्षे बद्दल अशीच आहे). त्याच्याच सोबत शाळेच्या परीक्षांना आपण समर्थ पणे तोंड दिलेलं असतं .नाही म्हणायला  कुलकर्णी बाईंनी विचारलेला "तेरा" चा पाढा आणि लेखी परीक्षेत नं आठवलेला विज्ञानाचा प्रयोग आणि त्याचं नं आठवले पण झाकण्या साठी मी लिहिलेला अगम्य,अशक्य असा नवीन प्रयोग, जो वाचून त्या बाई सगळं विज्ञान विसरल्या असतील, हे अनुभव गाठीशी होतेच( इथेच कुठे तरी मी Science ला जाणार असं वाटायला हवं होतं नाही का?) 
      तेव्हा परिक्षा आहे म्हणून माझी आई लवकर उठायची अर्थातच माझी पण झोप मोड व्हायची मग "कारणे द्या","जोड्या लावा","रिकाम्या जागा भरा" ह्या तत्सम प्रश्नांची उजळणी व्हायची, परीक्षे हून आल्यावर कुणी विचारवं "काय मग कसा होता paper?" ज्यावर आपण "छान होता, मला सगळं आलं!!" हे उत्तर देऊन मोकळं व्हावं आणि आईनी घेतलेल्या उलट तपासणीत वेगळ्याच रिकाम्या जागा वेगळ्याच शब्दांनी भरल्या आणि जोड्या चुकीच्या लावल्या हे  निदर्शनास यावं असं माझं बरेचवेळा झालंय. 
"पर कुछ नहीं, चलता है! अगली बार कर लेंगे, उसमे क्या?" ह्या वाक्यांनी माझी नेहेमी साथ दिली.
         पाचवी, सहावी  पासून आपला अभ्यास आपणच करायचा हा दंडक लागला आणि परीक्षेच्या काळात माझा alarm मीच लावू लागले. मग मराठी च्या पेपर च्या आधी व्याकरणाचे नियम, इंग्लिश चे शब्दांचे अर्थ आणि इतिहास, भूगोलाची सुरेख सफर माझी मलाच करावीलागे. त्यातही जो विषय नावडता त्याच्या पेपर च्या वेळी अभ्यास करतांना प्रचंड झोप येई मग परिक्षा hall मध्ये उत्तरं आठवतांना होणारी तारांबळ, "ह्याचं उत्तर तेच नं जे मी खिडकीत बसून अभ्यास करतांना वाचलं होतं", नाहीतर उत्तर आठवलं नाही तर मग "आता काय ठोकू बरं?" असा चाललेला स्व-संवाद जो अगदी आता आता परेंत कायम होता. अश्याच नववी परेंतच्या परिक्षा गेल्या.
         आणि मग आली "परीक्ष्यांची राणी", "दहावी" आहाहा काय तो माज!
"दहावी ची मुले" असा  एक वेगळा समाज असावा अशी त्या मुलांना वागणूक मिळते. सगळे नियम वेगळे, अचानक काय झालं आपल्या आजूबाजूच्यांना हे आपल्याला कळतच नाही. सावराव तोवर पहिली तिमाही येते आणि रंग दाखवून जाते, "पहिली बोर्डाची परिक्षा आहे बरं, चांगली दे. नाही म्हणजे इथे confidence मिळाला तर मग फारच चांगलं होईल हो!","दहावीची परिक्षा हा आपल्या आयुष्याचा turning point असतो बरं बाळा!!, चांगली दे" ह्या आणि अश्या अनेक वाक्यांनी आपण भांबावून जातो आणि जमेल तसा अभ्यास करतो. आपल्या अभ्यासाची प्रगती, अधोगती क्लास मध्ये सतत चालणाऱ्या परिक्षा दाखवत असतातच.
prelims च्या दिव्या मधून निघून आपण आपल्या पहिल्या वहिल्या PL 
परेंत पोचतो. तेव्हा काय बडदास्त ठेवली जाते लोकहो!! हातातच ताट काय,
वेळेवर चाहापाणी काय वा वा वा !!! पण हे सगळं ह्या साठी कि "चांगले मार्क मिळव राजा, बर्याच अपेक्षा आहेत तुझ्या कडून". माझा स्वतःचा 
दहावीच्या परीक्षेचा अनुभव काही असा होता, पहिला पेपर मराठीचा  तशी विषयाची भीती वगरे फार न्हवती पण नवी जागा नवे लोक ह्यांच्यात परीक्षा देण्याचा पहिलाच अनुभव. बरं जाताना पेन, पेन्सिल इ. इ. सोबत 
"Hall Ticket" नावाचा प्रकार प्रथमच सोबत न्यावा लागणार होता. 
परीक्षा केंद्रावर एक तास आधीच पोहोचा वगरे वगरे गोष्टींचा भडीमार,
ह्या गोष्टी सांगताना लोक नेमक्या "अहो त्या राणेंची गाडी पोराला परीक्षेला नेता नेता बंद पडली हो!! मग काय तारांबळ, रिक्षा शोध न बस शोध शेवटी उशीर झालाच पोचायला, तुम्ही आपलं लवकर निघा हो, एक आपला अनुभव सांगितला!!"  अश्या आठवणी आणि अनुभव लोक सांगतात.   
 कामवाल्या मावाशीपासून ते अगदी  त्या टोका वर राहण्याऱ्या  काकांपरेंत सगळ्यांना मला शुभेछा देण्याची आणि "अनुभव" सांगण्याची भारी हौस.
center वर पोहोचे परेंत "आपली गाडी बंद तर नाही ना पडणार?"," आपला नंबर नक्की इथेच असेल ना?" असे एक ना हजार प्रश्न. उत्तरं मिळतात आणि माझी स्वारी परीक्षेला पोचते, पेपर बरा असतो त्यामुळे tension कमी होतं अशीच सगळी परीक्षा संपते आणि तीन महिन्याची मोठ्ठी सुट्टी लागते. ह्या सुट्टीमध्ये सुद्धा परीक्षेच्या भुताने माझी पाठ सोडली नाही,
मी परीक्षे ला पोचले आणि center कुठेतरी दूर डोंगरावर होतं अशी स्वप्नं 
मला नेहेमी पडायची result जवळ येतांना तर विचारू नका त्याच दिवशी 
पेपरात भविष्य "अनिष्ट घटना घडेल(?)" असे आल्या वर सांगा बरं काय अवस्था झाली असेल माझी. थोड्या फार फरकाने अशीच माझी बारावी सुद्धा गेली आणि "बोर्डाच्या दोन दोन परीक्षा आपण पास झालो!!" म्हणून मला स्वतः बद्दल फारच अभिमान वाटू लागला.
          पुढे B.Sc. ला फार परीक्ष्यांची सवय  झाली म्हणून  कि काय फार त्रास झाला नाही. नाही म्हणायला chemistry च्या practical मध्ये केलेली 
गडबड आणि चुकवलेली readings गालबोट लावायला पुरेशी होती. semester पद्धतीशी पहिली ओळख आणि मग गाढ मैत्री इथेच झाली.
        M.Sc. ची परीक्षा मात्र सर्वांपेक्षा अगदी वेगळी, तुमचं अख्खं notebook जरी पाठ असेल तरी परीक्षेला बसल्या वर," मी काही अभ्यास केलाय कि नाही?" असं वाटायला लावणारी परीक्षा मी इथे अनुभवली.
घरा पासून दूर hostel मध्ये राहून नवीन जागेवर अभ्यास करून परीक्षा देण्याचा thrilling अनुभव मी ह्या परीक्षे मुळे घेतला. कधी नं बघितलेले 
मार्क ह्या परीक्षेनी मला दाखवले आणि त्यातून काय आणि कसं शिकावं हे सुद्धा दाखवून दिलं. ह्याच परीक्षेत अनेक वेळा अश्या सुद्धा आल्या कि पेपर लिहिता लिहिता मी आपल्याला किती मार्क मिळतील ह्याचं गणित मांडत बसले. त्या नुसार मग A सुटतो आहे का B,C वरच समाधान मानावं   लागणार कि अजून काही दिव्यं बघावं लागणार आहे ह्याची तयारी करावी 
हे clear व्हायचं. 
         सर्वच परीक्षांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे "option" ला टाकणे.
त्याच्या शिवाय परीक्षा होतंच नाही. मग पेपर ला गेल्या वर "अरे मी त्या पाचव्या chapter मधले दोन proofs नाही केले यार!!","मी तर तो अर्धा chapter option ला टाकला आहे", अश्या गप्पा चालू असतात मी ह्या सगळ्यात पडत नाही कारण मला एव्हाना हे लक्ष्यात आलं असतं कि हे लोक ज्या पाचव्या chapter बद्दल बोलतायेत," तो मी अख्खा option ला टाकला आहे!!!!". " पेपर च्या एक तास आधी पासून अभ्यास बंद करावा" हे मी अगदी तंतोतंत पाळते (M.Sc. ला एकाचा अर्धा झाला).
       काही प्रकार च्या परीक्षा आहेत ज्याचा मला अगदी मनापासून तिटकारा  आहे आणि त्या म्हणजे "Entrance Exams", ह्यांची तर्हा  वेगळी.
पण जास्त भाव ह्याच खातात.
       आता माझ्या किंबहुना माझ्या वयाच्या सर्वच लोकांच्या आयुष्यातली 
हि अशी परीक्षा संपली आहे. ज्या वर्ग बरोबर आपण बसलो आणि वर्षभर  शिकलो   त्या वर्गातल्या  सगळ्यांसोबत  बसून  आपण कदाचित  आता परत पेपर लिहू शकणार नाही. परीक्षे आधी आणि नंतर ची मजा, thrill  आता आपण miss  करू कारण आता आपले सगळयांचे पेपर वेगळे वेगळे आहेत "portion" वेगळा आहे आणि "option" ला टाकता येणार नाही.......