माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Thursday 11 August 2011

गोष्ट एका चोरीची

     एक आटपाट नगर होतं, नगरात सगळे सुखात नांदत होते. खाण्या-पिण्याची चंगळ होती, नगरातले लोक  "मिळून-मिसळून" राहत. प्रत्येकाकडे नोकरी होती, मुला-बाळांना शिक्षणा ची चांगली सोय होती. प्रत्येकाचे घर म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. एकाने घरात नवी वस्तू आणली कि दुसर्या कडे ती लगेच येई. कामवाल्या बाया नियमित येत,फेरीवाले तर अगदी न चुकता येत असत.  नगरात कायदा सुव्यावास्थे ची स्थिती तर फारच उत्तम होती. 
          अर्थातच लोकांचा bank balance चांगला होता. पण तेथील काही लोकांना एक खोड होती, आपल्या बॅंके च्या account मधले किती पैसे कोणाला द्यायचे, कशाच्या FD बनवायच्या आणि किती policy मध्ये टाकायचे ह्या बद्दल ते लोक  "भ्रमणध्वनी" वर जोर-जोरात "चर्चा" करत. काही बायकांनी तर locker चा number तेवढा सांगायचा बाकी ठेवला होता. "Mobile कंपन्यांच्या अवकृपे मुळे" त्या "बिचाऱ्या" लोकांना गच्चीत किंवा चक्क रस्त्यावर येऊन बोलावे लागे आणि तेही "कोकलावे" लागे. ह्या रोजच्या सरावा मुळे त्या लोकांचा आवाज "फारच" मोठा झाला होता. "नियमित" त्या नगराला भेट देणार्यांच्या "कानातून" हि गोष्ट सुटणारी न्हवती. हा प्रकार न करणाऱ्या इतर लोकांना मात्र ह्या गोष्टीचे tension येई, ते आपल्या कडून अशी काही चूक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत.
       जोरात फोन वर बोलणे इतकीच लहानशी गोष्ट त्या नगरा ची शांतता भंग करण्यासाठी पुरेशी होती. एके दिवशी त्या सुंदर, शांत आणि सुशिक्षित लोकांच्या नगरात "दरोडा" पडला आणि हाहाकार उडाला!!! लोक चिंताग्रस्त झाले. "आता काय करावे??, कुणाकडे जावे??" हे कळेना. सुरक्षा रक्षक पाहणी करून गेले पण चोरांचा काही पत्ता लागला नाही, पण सुरक्षा रक्षक एक रात्रपाळीचा शिपाई देऊन गेले. तो रात्री नगरच्या सुरक्षेची काळजी घेई. त्याच्या येण्याने लोकांचा जीव भांड्यात पडला आणि नंतर काही दिवस चोरी सुद्धा झाली नाही. लोकांना वाटले "चला सुटलो" , "त्यांचा" फोन वर जोरात बोलण्याचा सराव अबाधित पणे चालूच होता. परत चोरी झाली आणि मग मात्र छोट्या-मोठ्या चोऱ्या होताच राहिल्या आता लोकांना सवय झाली होती. 
     असेच दिवस जात होते, लहान मुलांच्या परीक्षा झाल्या आणि ती मामाच्या गावाला जायचा हट्ट धरू लागली. अश्यातच एक "tension" घेणाऱ्या घरातील लोकांना लग्नाचे बोलावणे आले, जुन्या मित्राच्या मुलाचे लग्न होते, सगळा मित्र परिवार भेटणार म्हणून लग्नाला जाणे नक्की केले. रेल्वेची तिकिटे काढली चारही तिकिटे "confirm" मिळाल्याने घरातील लोकांच्या आनंदाला उधाण आले होते. पण 'आपण घरी नसताना आपल्या घरी चोरी झाली तर?' अशी पुसटशी भीतीहि  त्या लोकांना वाटली. शेवटी चांगल्या प्रकारे कडी-कुलुपे घालून सर्व नीट बंद असल्याची खात्री करूनच लोक निघाले.  
    प्रवास लांबचा होता, पण तोही पूर्ण झाला आणि लगीन घरी लोक पोचते झाले. विधी एका मागून एक चालूच होते, आगत स्वागत झाले. बरर्याच वर्षांनी मित्र भेटल्याने सगळे आनंदात होते. रिंगण करून गप्पा मारण्यात वेळ जात होता. कोण कुठे आहे? काय करतो आहे? कोणाला किती मूले आहेत? मूले कित्ती मोठ्ठी झाली (आपण किती म्हातारे झालो) अश्या मजेशीर चर्चा चालू होत्या. लगीन घरची सोय चांगली होती आणि कार्यक्रम सुद्धा उत्तम प्रकारे आखला होता अश्यातच दोन दिवस कधी गेले समजलेच  नाही. सगळ्यांचे फोन नंबर, पत्ते घेऊन परत भेटण्याचे नक्की करून मग "घरातील" लोक निघाले. जाताना एक मित्रकडे एक-दोन दिवस मुक्काम करण्याचा बेत होता. त्या प्रमाणे लोक मित्रकडे आले, बर्याच दिवसांनी मित्र,  परिवारा सकट आल्या मुळे यजमान खुश होते. त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने मोठ्या प्रेमाने पाहुण्यांचा पाहुणचार केला. 
          असाच मजेत एक  दिवस गेला तिसर्या दिवशीच "घरातील" लोकांचे परतीचे "confirm" तिकीट होते. आणि काळाचा आघात झाला घरातल्या लोकांचा "भ्रमणध्वनी" खणखणला घरा जवळ राहणाऱ्या एका गृहिणींचा तो फोन होता. "घरात, चोरी झाली होती!!!", "दोन दिवसांपासून घरातील light चालू आहेत, तुम्ही तर घरी नाही मग हे कसे झाले?".
           अनर्थ!! घोर अनर्थ!!!! "घरातील लोकांनी" इतरांना कुलूप लावायला सांगितले आणि फोन वरूनच पोलिसांना खबर दिली. सर्व जुळवाजुळव करून आणि "confirm" तिकीट cancel करून ते निघाले,
 पण नशिबाची पण थट्टा बघा ज्या गाडीने निघाले ती गाडी "नगरात" जवळपास सतरा तासांनी पोचली (जो प्रवास १०-१२ तासांचाच होता). आपल्या लाडक्या घराची अशी अवस्था झालेली बघून "लोकांच्या" अश्रूंचा बांध फुटला!!!!! पण जे गेले ते तर गेलेच!! वडिलोपार्जित पूजेचे साहित्य, जिव्हाळ्याचे दागिने सगळेच नदारद होते. 
       "घरातील" लोक आलेले पाहून इतर "मिळून-मिसळून" राहणारे लोक सुद्धा आले. "दार नीट लावून गेले नव्हतात का?", "हे तुमचं दार आहे न त्याची दिशाच चुकीची आहे, इथे अश्या घटना होणे स्वाभाविक आहे(???)", "तुमच्या कडे फार काही असेल असं वाटत नाही हो!!!", "अहो दागिने न
 नेहेमी locker मधेच ठेवावे", "घरात कुणाला तरी झोपायला सांगायचं न!!"
 "आता काई वस्तू सापडणार नाहीत बघा, मी सांगते आमच्या ह्यांच्या ओळखी आहेत पोलिसात पाहिजे तर हे शब्द टाकतील तुमच्या साठी(!!), मिळालं काही नशिबाने तर मिळेल!!!!!"
        एवाना "घरातील" लोकांचा "नशीब" ह्या शब्दाचा चांगलाच साक्षात्कार झाला होता. पोलीस आले, मोठा ताफा घेऊन आले!!! ताफ्यात "गोल्डी" नावाची काळ्या रंगाची कुत्री होती, घरात तिने चोरांचा वास घेतला, दरम्यान तिला सांभाळणारा पोलीस तिच्या "उत्कृष्ट" कामाचे अनेक किस्से घरातील लोकांना सांगत होता. हवालदिल झालेल्या त्या "बिचाऱ्या घरातील" लोकांकडे त्या कथा ऐकण्या पलीकडे काही गत्यंतर नवते.  त्या पाठोपाठ एक "finger print expert" येवून गेला, त्याने घरात अनेक ठिकाणी काळी पावडर लाऊन "finger prints" घेण्याचा प्रयत्न केला.
घरात आलेले चोर हे काही साधे नव्हते ते "सराईत गुन्हेगार" असल्याचे त्याच्या तपासात स्पष्ट झाले. 
      अश्या प्रकारे ते घर "वास्तुशांत" झाली तेव्हा सुद्धा जितक्या लोकांनी बघितले नसेल तितक्या लोकांनी बघितले. सगळ्या नगरात, इतका फौज-फाटा आला हि बातमी वेगानी पसरली, भेटायला येणार्यांचा ओघ निदान महिनाभर तरी चालूच होता, चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के 
रक्कम तर आल्या-गेल्यात गेली. 
        पण हा विचार कुणीच केला नाही कि त्या घरातील लोकांना काय वाटेल? "आपल्या घरात कुणीतरी आपण नसताना येऊन गेलं, त्या माणसांना आपल्या घरातली कुठली वस्तू  कुठे आहे हे  नाही माहिती आहे"  हि भावनाच भयंकर होती. घरातील लोकांना झोप लागत नसे. आणि जिव्हाळ्याच्या वस्तू तर गेल्या होत्याच, पण म्हणतात न "time heals" तसंच झालं आणि ते हळू-हळू सावरले. वस्तू सापडल्या कि नाही हा मुद्दा गौण झाला पण एक थोडी शिकवण देणारी गोष्ट मात्र सापडली.