माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Thursday 20 September 2012

निबंध

         अगदी शाळे पासून माझा आवडता प्रकार. मराठीच्या पेपर साठी बाकी तयारी सगळी करावी लागायची पण निबंधाची तयारी फार कधी करावीच लागली नाही. बाकी पेपर आठवून आठवून लिहायचे मी पण निबंधाची वेळ आली कि मी माझ्याच विश्वात!!!! त्यातही माझा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे "आत्मवृत्त" अगदी कश्याच पण आत्मवृत्त लिहिणे म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ!!! 
          फुशारक्या नाही मारत, मार्क पण मिळायचे!! माझी आणि निबंधाची गट्टी कधी जमली असा विचार करायला गेले तर ऋणानुबंध जुना असल्याचं लक्षात आलं. घरी आई-बाबांनी वाचनाची आवड लावली, काही नाही तरी माणसाने रोजचा पेपर तरी वाचायला हवा असं त्यांचं धोरण. "अगं शब्दसंग्रह वाढतो , वाक्यरचना सुधारते" ह्या वाक्याचा अर्थ तेव्हा समजला नवता. पण चांगली गोष्ट हि कि मी शहाण्या मुली सारखं ऐकलं आणि फायदाच झाला.  मग एका मागून एक पुस्तकं माझ्या संग्रही आली आणि माझी मैत्री झाली त्यांच्याशी. हि पुस्तकं खरोखर तुम्हाला एका वेगळ्या विश्वात  नेतात , कल्पनाशक्ती नावाची जी hidden power आपल्यात असते ती जागृत करतात. पण एक पुस्तक एकदाच वाचू शकते मी, परत परत त्या विश्वात मला जायला आवडत नाही. मग वाटू लागल कि एकदाच काय ती "सफर" घडवणारी हि माझी दोस्त मंडळी काही फार उपयोगी पडत नाहीयेत. हि
कथा मी  अगदी  चौथी पाचवीत असतांनाची, त्या नंतर कदाचित हे "निबंध" महाशय आमच्या परिचयात आले.
          पहिला निबंध वगरे काही मला आठवत नाही पण चौथीच्या scholorship च्या पुस्तकातल्या म्हणी आणि वाक्प्रचार वापरून लिहिला होता मी तो. आम्हाला निबंधाची वही मिळायची घरी, बाई शाळेत विषय द्याच्या आणि घरी लिहायला सांगायच्या. हा programme बहुतेक रविवारी होत असावा कारण मी नंतर घरी सगळ्यांचं डोकं खात असे; अगदी पाहुणे जरी आले असतील तर त्यांना सुद्धा सोडत नसे,  मी "कित्ती" अभ्यासू आहे हे दाखवण्याचा हा माझा फंडा होता.  पण माझा निबंध चांगला जमत असावा कारण शेरा सुद्धा "छान" चा मिळायचा.
         पुढे निबंध पेपरात मार्कांचं लेणं ल्यावून आला आणि जास्तच भाव खावू लागला, मग खास त्यासाठी पुस्तकं वगरे मी धुंडाळू लागले, इतर पुस्तकं माझ्या गाठी जमा होत होती. आत्ता वाटू लागलं कि लहानपणचे पुस्तक मित्र अजूनही डोक्यात घर करू आहेत, कधीतरी त्यातली एखादी छोटी गोष्ट किंव्वा प्रसंग आठवायचा आणि लिहितांना मदत करायचा.  खरोखर मार्कांच्या चौकटीत आपला निबंध कसा बसेल? वगरे विचार करून मी निबंध लिहू लागले. थोडीफार चौकट साधली सुद्धा!!!
          पण मग त्यातही आपली काही खास आवड निवड आहे असं जाणवू लागलं, असं नको तसं लिहावं, हे नको तेच लिहावं वगैरे. मला जर कुणी फक्त निबंधा वरच परीक्षा आहे असं सांगितलं असतं न तर ती परीक्षा मी निक्षून दिली असती!!!!
           काही दिवसांनी माझी ओळख झाली ती निबंध स्पर्धा नावाच्या मला भाग घ्याव्या वाटणाऱ्या स्पर्धेशी. कारण काये कि मला मुळात स्पर्धा वगरे काही आवडत नाही, त्यात त्या असायच्या चित्रकला, गायन वगरे माझ्या सुप्त गुणांच्या, माझी आपली धडपड कि सुप्त गुण सुप्तच राहावे!!! उगाच प्रदर्शन कशाला? पण निबंध स्पर्धा हा माझा जिव्हाळ्याचा विषय बनला, शाळेत सुद्धा त्यात भाग घेतला, नाही म्हणायला उत्तेजनार्थ, तिसरा वगरे क्रमांक नशिबी आला पण आपल्या आवडीची गोष्टं करतोय ह्यातच समाधान!!!
          पुढे शिक्षण घेण्यासाठी मी R.Y.K. चं दार ठोठावलं, त्यांनी सुद्धा आनंदानी आत येऊ दिलं. इथे आम्ही Science चे विद्यार्थी असल्याने "ह्यांना काय साहित्याची समज?" असं  "गाढवाला गुळाची चव काय?" style मध्ये आमच्याकडे पहिलं  गेलं. पण मी बिचारी गरीब बापुडी इथे सुद्धा  निबंध स्पर्धेला जाऊन बसले, आणि पहिला वगरे मिळवला (हि बंडल नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी)
त्या स्पर्धे साठी खरच कष्ट घेतले होते. पण Science side घेतली आणि माझा माझ्या आवडत्या निबंध  प्रकाराशी  संबंध थोडा कमी झाला, संपलाच जवळ जवळ. मग M.Sc. मध्ये तर नावंच नाही.
          तरी एक किडा असतो तुमच्यात तो काही शांत बसू देत नाही सारखं वाटत होतं "लिहायचच नाही म्हणजे काय?" मग मला हा मार्ग सापडला आणि मी लिहिती झाले!!! आता तयारी नाही करत न कोणी तपासून मार्क देत पण मी लिहिते स्वतः साठी.
          मला आज निबंधाची आठवण का आली? मी शिकवत असलेल्या  कॉलेज मध्ये आज निबंध स्पर्धा आहे आणि मी स्पर्धा चालू असलेल्या वर्गात बसले आहे, निबंधाचा विचार करत!!! 

Monday 13 August 2012

Morning Glory

              फेब्रुवारी , मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि आता ऑगस्ट; महिने मोजतेय मी. मागची  पोस्ट
 लिहून इतके दिवस झाले, नाही म्हणायला माझ्या काही लाडक्या (मोजक्या) वाचकांना आठवण झाली "लिहित का नाहीस गं हल्ली?" असे गोड प्रश्न त्यांनी विचारले, पण माझ्यातल्या लेखकाकडे
त्यांची  उत्तरं  न्हवती; कदाचित लेखकाला डोकावायला वेळच न्हवता.
               पण कधी - कधी काही गोष्टी अश्या घडतात कि ज्या वेळ काढायला भाग पडतात. तुमच्या आयुष्यात गोष्टी ठीक-ठाक चालू आहेत; अगदी हव्या तश्या नाहीत पण अगदीच नकोश्या पण नाही पण तरी......
              एका point ला तर मला असं  वाटायला लागल होत कि माझा  ब्लॉग  हा फक्त interview मध्ये सांगायची गोष्ट झालाय "I write a blog in marathi" , But am I "Writing?" it- No
काहीतरी मागे खेचत होतं मला, किंवा काही सापडत न्हवतं मनाजोगतं. रोज सकाळी कामावर  जायची घाई
 मग आल्यावर थकवा, झोप  आणि मग पुन्हा दुसरा दिवस, पण दिवस घालवणे आणि 
साजरे करणे ह्यात फरक असतो, मी घालवत होते!!
             पण देव काही तुमची पाठ सोडत नाही तुमच्यातला कलाकार नाही कलाकार तरी रसिक झोपू नये ह्याची तो पुरेपूर काळजी घेतो, मग ह्या न त्या कारणाने तुम्ही जागे होता आणि त्याची आज्ञा  पाळता.
            परवा सकाळी मला ह्या गोष्टीचा साक्षात्कार झाला!! सकाळची वेळ तयारीला  लागावं  असा विचार करत असतांनाच मला एक चमत्कार दिसला!! हो तो चमत्कारच होता . माझ्या दारा  समोरच्या  झाडाला एक कोळ्याच जाळ आणि त्यात सुंदर हिऱ्यांचा हार बनलेला, मी माझा camera आणला  आणि  लागले कामाला...
           




                                            
पावसाच्या सरींनी आणलेली हि सुंदर भेट मला तरी जागं करून गेलीये.


Friday 3 February 2012

इलेक्शनने ना भोSSSSSS

         आन मग काय तर...इलेक्शन चा काळ हे!!! कार्यकर्त्यांची किती 
पळापळ  होती!!! पत्रकं वाटा, घरोघरी जा, माद्दार यादीत नाव आहे का 
नै ते तपासा, नसल तर त्यानला नाव टाकायची घाई करा लई कामं 
असत्यात. त्यात ह्या टायमाला इलेक्शन सना-वारा च्या जवळ पास
आले, मग तर इचारू नका राव. गणपती म्हनू नका, नवरात्र म्हनू नका, दसरा म्हनू नका, दिवाळी म्हनू नका रांगच लागली ना सनांची. 
      गणपती च्या टायमाला तर "सायबांचे " poster लावता लावता दमून गेलो आमी, गणपती बसायच्या दिवसा पासून सुरु होऊन दीड, पाच, सात आनी मग धा दिवसांच्या परेंत "गणेश भक्तांचे स्वागत आहे", "गणपती बाप्पा मोरया" आशे किती तरी फलक लावावे लागले
सोबत "साहेब" नै तर "ताई" चा हात जोडून फोटो असलाच पाहिजेल,
आन मग आम्ही नै का "शुभेच्छुक", नाहीतर "कार्यकर्ते" म्हनून 
असतो, लई भारी फोटो काढला हुता, "passport size"!!!!  
      मंडळाला सायबांची किती मदत झाली, भारी भारी कारेक्रम केले
एक मस्त "लिटील च्याम्प फेम", "इंडिअन आयडल फेम" कलाकार
आलाच म्हनून समजा, पब्लिक  खुश आन आपन बी. दांडिया हा लई महत्वाचा event व्हता. दांडिया येओ न येओ गल्लीतल्या आया -बाया आल्या हुत्या ना, DJ लावला मस्त
 धमाल केली,रावन जाळायची आर्डर आली, तशे आमी परत कामाला....मस्त म्होटा रावन केला तयार, वार्डात चिल्ली-पिल्ली खुश!!!(सोबत माय-बाप पन..) तवा पन यक कारेक्रेम केला, तो पन पब्लिक साठी फुकट. आन मग काय तर, जनतेचे शेवक व्हायासाठी करा लागते. 
        ह्या येळेची दिवाळी पण लई जोरात झाली "ना नफा ना तोटा"
 तत्वावर फटाके विकले ना आमी. परत पत्रक वाटली दिवाळीची कविता
केली होती लई भारी (आपल्याला नाही समजली पन शेवटी दिवाळी च्या शुभेछा होत्या म्हनून.... ). वार्डात बायकांना घरोघरी दिवे वाटायला पाठवलं न, येका येका पिशवीत चार चार दिवे!!!! तवा भाऊ सगळ्या घरी जाऊन शुभेछा देऊन आले. 
        लोका साठी "दिवाळी दसरा आनी हात पाय पसरा " असते पन
 आपली नाही ना राव, कसं हे, मग नाताळ आनी "New Year" नाही का येत. "नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा"!!! लागले न बोर्ड!!!!!. नवीन वर्षाच्या निमित्तानी तर मग काई इचारू नका "New Year Party" जोरात परत म्होटा कलाकार आला अनि पब्लिक खुश 
करून गेला. 
      आता बोलाल संपलं नाही का पुराण, हे कई पुराण आहे का??? (हि गाथा हे), नवीन वर्षाचा बहर कुठं संपला अजून? पत्रक राहिली कि वाटायची!!!! आन आता नवीन वर्षानिमित्त "दिनदर्शिका" घरोघरी वाटली, एक काका म्हनले "आरे किती देता कॅलेंडर, कुठे कुठे लाऊ?" आपण बोललो "काका भिंती कमी हायेत का घराला?,परतेक भिंतीवर एक, तारीख विसरलीच नाही पायजेल". काका हसले...
    मग "तीळ गुळ घ्या अनि गोड गोड बोला" अहो आपली संक्रांत.
आपल्यावर  संक्रांत येऊ नये म्हनून भाऊंनी लई तयारी केली, घरोघरी 
पत्रक सोबत हलव्याची अनि तिळाची एक पुडी!! मग वहिनींच्या 
डोक्यात आयडिया आली म्हणल्या "हळदी कुंकवाचा" कारेक्रम करू.
पन काय हे कि आमच्या वार्डात कामावर जाणाऱ्या बायका खूप!!! मग कस जमनार ना, तवा हळदी कुंकवाचा करंडा अनि वान 
घरपोच!!!!(सोबत पत्रक). भाऊ बोलले अजून काहीतरी करू, मग 
काय केलं???? आहो एक पुस्तिका बनवली त्यात सारे म्हत्वाचे नंबर, 
छोटी "डिरेक्टरी"!!!!! 
    तवर उमेदवार यादी जाहीर झाली....आन काय सांगू साऱ्या कष्टाचं
चीज झालं.....भाऊंना पक्षाचं  तिकीट जाहीर झालं!!!!!
भाऊ जाम खुश झाले.....त्या दिशी बैठक घेऊन भाऊ म्हणले तुम्हा 
कार्यकर्त्या मुळे हे शक्य झालं आता अजून जोमानं कामाला लागा 
आता इलेक्शन जिंकायचं.
      काल पासून "Laptop" घेऊन घरोघरी फिरतोय, लोकांना मतदानाची चिट्टी घरपोच द्याची अशी आर्डर हे!!!!!
लोकांनो भाऊ इतके कष्ट कारायालेत जरा तुम्हीबी करा......
मतदानाला जा...............