माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Sunday 6 November 2011

दर्शन?

      शब्द माहितीतला आणि पुढे प्रश्नचिन्ह का? असे प्रश्नचिन्ह तुमच्या मनात येऊ शकते, पण मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे. 
दिवाळी च्या सुट्टीच्या निमित्ताने छोटी trip काढायचं ठरवलं आणि
आम्ही कोकण, कोल्हापूर आणि अजून थोडी आसपासची ठिकाण बघण्याचा 
plan बनवला. कोकण दर्शन तर अगदी उत्तम झाले, छोटी छोटी 
देवस्थानं, सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे, अगदी मजा आली. 



गणपतीपुळे   च्या मंदिराने तर मोहिनीच घातली, शांत सुंदर वातावरण आणि चांगले नियोजन ह्यांनी मनाला शांतता मिळाली

इथली  प्रदक्षिणा तर खरच फारच लक्षात राहणारी होती, देव चांगली सेवा 
करवून घेतो  भक्तांकडून. प्रत्येक गोष्ट अगदी नीट-नेटकी आणि नियोजनबद्ध, राहण्याची सोय सुद्धा छान. Sand-art सध्या फार प्रसिद्ध
आहे मग आम्ही पण आपला हात अजमावला आणि sandman बनवला
इथ परेंत सफर अगदी सुरेख चालू होती मग तुम्ही विचाराल कि
प्रश्नचिन्हाचा अर्थ काय? तर ती कथा इथे सुरु होते, पुढे आमची गाडी कोल्हापूर कडे वळली, अंबाबाई चे दर्शन घायला आणि सगळा भ्रमनिरास झाला. मान्य, कि इथे गर्दी जरा जास्त असते आणि सुट्टी मध्ये तर जास्तच, पण अत्यंत ढिसाळ नियोजन आणि भावना शून्य लोकांचा इथे भरणा आहे. गेल्या वर राहायला जी जागा मिळाली ती माणसांच्या राहण्या लायकीची नवतीच मुळी, आणि AC, non AC च्या फंदात उणे पुरे १५०० रुपये उकळले गेले, जायला एरवी कुणी ५०० सुद्धा 
दिले नसते. पुढे मंदिर दर्शनाची वेळ आली, बाहेर देवीला चढवायची ओटी 
मिळते कमी अधिक नाही चांगले २०० रुपये घेतले गेले, आता ती साडी
 देवी ला "कितव्यांदा" चढवली जात होती हे ती अंबा बाईच जाणे.
        दर्शनाची हि भली मोठी रांग त्यात मला भावनाशुन्य जे म्हणतात 
तशे लोक दिसले, इथे आलेले लोक हे लोक नसून गुरं-ढोरं आहेत आणि 
आपण गुराखी आहोत अश्या आविर्भावात ते वागत होते. आपण आपले 
तासंतास रांगेत उभे राहा आणि कोणा बाईच्या "अंगात" काय येते आणि ती आपली फटाफट पुढे जाते ह्याला काय अर्थ आहे? तेव्हा मात्र हे 
"गुराखी" मुग-गिळून गप्पं बसतात आणि बाकी लोक रांगेत एका 
ऐवजी दोन जण सोबत उभे राहिले तर मात्र उर फुटेस्तोवर 
बोंबलतात का तर म्हणे इतरांना जाता येत नाही.
       आत सोडल्यावर तर देवी पेक्षा माणसेच जास्त राज्य करतात, 
"ओ ताई काय बावळट सारखं करता? दिसत नाही का? समोर चला(!!!!)"
ह्या शहाण्याला हा अधिकार "देवीनेच" तर दिलाय म्हणत आपण सुद्धा पुढे निघतो, "चला चला हला हला" च्या आरोळ्या हे "मेंढपाळ"
देत असतात आणि "भक्तरुपी गुरे" पुढे चालत असतात. देवी जवळ पोहोचा, मी अंबा बाईची शप्पथ घेऊन सांगते मला मंदिरात 
जाऊन सुद्धा ती दिसलीच नाही, कारण "चला चला हला हला"!!! . आईने थांबून प्रसाद घेतला पण तेही अनेक धक्के खात, बाहेर येई परेंत त्या आरोळ्या तुमची पाठ सोडत नाहीत.
        माणूस मंदिरात कशाला जातो? देव बघायला! अरे पण जर हि 
अशी परिस्थिती असेल तर मग मंदिर काय कामाचं? घरीच बसा आणि देवीचा फोटो बघून मनः शांती करून घ्या न. माझा कुणाच्याच भावना 
दुखवायचा हेतू नाही पण माझा मंदिरात जाऊन दर्शन घेण्यावारचा
विश्वास उडाला आहे, ह्या प्रकारामुळे. आता मी हा फोटो बघूनच देवी कडे मागणं मागते "बघ बाई जरा..."

    
    

Tuesday 4 October 2011

कारणे द्या

               आजकाल मला हि नोटीस फारदा बजावावी लागते...
दोन महिन्यापूर्वी  नाशिकच्या एका नामांकित महाविद्यालयात मी नोकरीला लागले  आणि आत्ताच शिक्षण झालेल्या माझ्या बाबतीत 
अनेक गोष्टी बदलल्या. तशी अगदी लहान टीचर, मुलांना सुद्धा लवकर पचवता 
आली माझी सुद्धा language त्यांच्या जवळपासचीच असल्याने communication barrier  कधी आला नाही. तर हे माझे students "फार हुश्शार" आहेत.
आणि गम्मत नाही करत खरच हुशार आहेत.  एकतर पटापट शिकणारे आहेत ज्यामुळे माझं काम सोपं झालं आहे. टीचर लोकांना फक्त हुशार मुलं असून चालत नाही, रोज lecture ला यायला पाहिजे, वेळेवर journals, practicals submit पण करायला हवीत ना. तिथे थोडी गडबड होते आणि मग ह्या मुलांच्या सुपीक डोक्यातून अनेक भन्नाट 
कारणे निघतात, आता मी त्याचेच काही नमुने देणार आहे.
             अगदी पहिल्या दिवसा पासून सुरु करायचं म्हणलं तर "अरे lectures सुरु झाले पण!!!! आम्हाला वाटलं टीचर नसतील आले, म्हणून आम्ही 
नाही  आलो!!!!" हे काही फार अचंबित करणारं कारण नाही हे मान्य पण हे पाहिलं होतं. Lectures सुरु होऊन चांगला महिना पंधरा दिवस झाल्या नंतर "Madam मेरी  तबियत इतनी ख़राब थी ना क्या 
 बताऊ?? Doctor ने bed rest लेने बोला था" आता कारणा वरून हे 
कुणा  नाजूक साजूक मुलीनी दिलेलं कारण वाटू शकतं पण नाही, हे कारण मला एका धडधाकट ६ फूट उंच मुलानी दिलं ज्याच्या प्रकृतीकडे
बघून हा निदान मागचं पूर्ण वर्ष आजारी पडला असेल असं कुणाला सुद्धा 
वाटणार नाही, पण असो कारण तर आहे ना. ह्या कॉलेजची इतकी मुलं 
कशी आजारी पडतात??? असा "भाबडा" प्रश्न माझ्या मनाला पडला.
नंतर नंतर मग मुलं हे कारण देताना आणि मी ऐकताना चेहऱ्यावर 
स्मितहास्य ठेवून काम चालत असे. काही मुलं तर अगदी महिन्या
 भराने येऊन "Actually mam आज मेरा  college का पहला दिन है!!!!"
"अरे वाह! well-come to college ,आज कैसे आना किया??" इति मी 
"वो मेरी mummy बीमार थी फिर papa भी काफी बीमार थे तो नहीं आ 
पाया" आता पोरं स्वतःवरून चक्क "Mummy,Puppa" परेंत पोचली  होती.
       आता महिना झाला म्हटल्यावर practical submission ची वेळ आली, इथे होता turning point एक से बढ़कर एक कारणे मी इथे ऐकली. "माझं journal ती माझी मैत्रीण घेऊन गेली आणि आता ती
hospital मध्ये admit आहे" ,"का??" , "फार serious झाली  ती मग 
हलवावं लागलं" ह्या कारणाच्या खोलात जाऊन उपयोग नाही हे माझ्या 
लक्षात आल्या मूळे मी "ठीक आहे नंतर दे" असं म्हटल्यावर "thank you mam!!" (आनंदाने) म्हणत जाताना दारातून वाकून "ती माझी मैत्रीण पण नाही देऊ शकणार बरका journal(!!!!!)" हे सांगायला 
ती मुलगी विसरली नाही. अशीच admit होण्या आणि करण्या ची गाथा सुरु राहिली. आता admit झाल्या नंतर "पाठवणी" पण करावी लागते पण ती अगदी तरुण लोकांची कशी करणार? तेव्हा "आजी , आजोबा", "कामी" येतात, आता परेंत मी निदान अर्धा डझन तरी
 "आजी, आजोबांच्या आत्म्याला परमेश्वर शांती देओ(!!!!)"अशी
 प्रार्थना केली आहे. एक मुलगा तर इतका "दुखी" झाला होता कि
 ह्याला "best actor 2011" देऊनच टाकावं असं मला वाटत होतं.
 "माझं reason genuine आहे madam, तुम्ही माझ्या journal वर
late mark नाही लाऊ शकत(!!!)" अश्या प्रेमळ धमक्या मला हि मुलं 
सारखी देत असतात. 
       आता जे कारण मी तुम्हाला सांगणार आहे ते माझ्या साठी तरी "out of the world" होतं. एका मुलीला परिक्षेला नं 
आल्या बद्दल मी विचारलं तर तिने मला कारण काय सांगव??
"मेरी chemotherapy चल रही है mam(!!!!!!!!!!!), I can't even explain the pain that I experience daily, I have to go to Mumbai for the treatment so I couldn't come, I have medical certificate with me if you want",
 Ohhhhh Myyyyy Gooooddd!!!! 
 मी फक्त खुर्चीतुन उडायची बाकि राहिले होते ती मुलगी मला "medical certificate" पाहिजे का म्हणून विचारात होती, आणि माझी नजर तिच्या केसांकडे गेली chemo मध्ये माणसाचे केस 
गळतात असं मी ऐकलं होतं पण ह्या सुंदरीचे केस hair settler कडून आत्ताच सेट करून आणल्या सारखे वाटत होते, अहो
अगदी तिच्या नखांची nail paint सुद्धा निघाली नवती.
 आता बोला!!!!!  
              असाच एक मुलगा आला सकाळी सकाळी अगदी घाईत,
lecture केले नाही वगरे सोपस्कार झाले. मग मूळ मुद्द्याला हात घातला गेला "मी आत्ता पुण्या वरून आलोय, हा आत्ता गाडीतून उतरलो आणि भेटायला आलो", "बापरे इतकी घाई का रे बाबा???"
"नाही madam तुम्ही journal submit करायला सांगितलं होतं ना ते नाही झालं हे सांगायला आलोय". किती कर्तव्य तत्पर असतात नाही मुलं आपण उगाचच त्यांच्यावर आरोप करतो.
 परवा एक मुलगी आली "mam तुम्ही stats शिकवता का?"
"हो", "मी sy ची आहे, actually मी medical leave वर होते(!!!!!)"
medical leave वर शिक्षक असल्यचे अत्तापारेंत ऐकिवात होते
हि बया student असतांनाच अश्या leave घ्यायला लागली होती,
"मला कॉलेज मधूनच admit केलं होतं,(पुन्हा admit) २ महिने मी hospital मध्ये होते परवाच discharge मिळाला आणि तुम्हाला भेटायला 
आले",मला आता परेंत आजारी माणसाला भेटायला जाणे माहित होते 
आता आजारी माणसे आपल्याला भेटायला येतात हा बदल मजेशीर
होता. विचारपूस करून ती मुलगी गेली lecture ला येते म्हणाली
आणि दुसर्या दिवशी lecture झाल्यावर आली, मला म्हणाली "actually mam माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी येऊ शकणार
नाही हे सांगायला मी आलेय" तिचं येणंच मला अनपेक्षित होतं पण मी तिचं reason ऐकून घेतलं, दिवस संपला घरी आले काही कारणाने
calender बघितलं कोपऱ्यात लिहिलं होतं "ह्या महिन्यात उपनयन आणि विवाह मुहूर्त नाहीत".............
         

   
  
   
  

Thursday 11 August 2011

गोष्ट एका चोरीची

     एक आटपाट नगर होतं, नगरात सगळे सुखात नांदत होते. खाण्या-पिण्याची चंगळ होती, नगरातले लोक  "मिळून-मिसळून" राहत. प्रत्येकाकडे नोकरी होती, मुला-बाळांना शिक्षणा ची चांगली सोय होती. प्रत्येकाचे घर म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. एकाने घरात नवी वस्तू आणली कि दुसर्या कडे ती लगेच येई. कामवाल्या बाया नियमित येत,फेरीवाले तर अगदी न चुकता येत असत.  नगरात कायदा सुव्यावास्थे ची स्थिती तर फारच उत्तम होती. 
          अर्थातच लोकांचा bank balance चांगला होता. पण तेथील काही लोकांना एक खोड होती, आपल्या बॅंके च्या account मधले किती पैसे कोणाला द्यायचे, कशाच्या FD बनवायच्या आणि किती policy मध्ये टाकायचे ह्या बद्दल ते लोक  "भ्रमणध्वनी" वर जोर-जोरात "चर्चा" करत. काही बायकांनी तर locker चा number तेवढा सांगायचा बाकी ठेवला होता. "Mobile कंपन्यांच्या अवकृपे मुळे" त्या "बिचाऱ्या" लोकांना गच्चीत किंवा चक्क रस्त्यावर येऊन बोलावे लागे आणि तेही "कोकलावे" लागे. ह्या रोजच्या सरावा मुळे त्या लोकांचा आवाज "फारच" मोठा झाला होता. "नियमित" त्या नगराला भेट देणार्यांच्या "कानातून" हि गोष्ट सुटणारी न्हवती. हा प्रकार न करणाऱ्या इतर लोकांना मात्र ह्या गोष्टीचे tension येई, ते आपल्या कडून अशी काही चूक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत.
       जोरात फोन वर बोलणे इतकीच लहानशी गोष्ट त्या नगरा ची शांतता भंग करण्यासाठी पुरेशी होती. एके दिवशी त्या सुंदर, शांत आणि सुशिक्षित लोकांच्या नगरात "दरोडा" पडला आणि हाहाकार उडाला!!! लोक चिंताग्रस्त झाले. "आता काय करावे??, कुणाकडे जावे??" हे कळेना. सुरक्षा रक्षक पाहणी करून गेले पण चोरांचा काही पत्ता लागला नाही, पण सुरक्षा रक्षक एक रात्रपाळीचा शिपाई देऊन गेले. तो रात्री नगरच्या सुरक्षेची काळजी घेई. त्याच्या येण्याने लोकांचा जीव भांड्यात पडला आणि नंतर काही दिवस चोरी सुद्धा झाली नाही. लोकांना वाटले "चला सुटलो" , "त्यांचा" फोन वर जोरात बोलण्याचा सराव अबाधित पणे चालूच होता. परत चोरी झाली आणि मग मात्र छोट्या-मोठ्या चोऱ्या होताच राहिल्या आता लोकांना सवय झाली होती. 
     असेच दिवस जात होते, लहान मुलांच्या परीक्षा झाल्या आणि ती मामाच्या गावाला जायचा हट्ट धरू लागली. अश्यातच एक "tension" घेणाऱ्या घरातील लोकांना लग्नाचे बोलावणे आले, जुन्या मित्राच्या मुलाचे लग्न होते, सगळा मित्र परिवार भेटणार म्हणून लग्नाला जाणे नक्की केले. रेल्वेची तिकिटे काढली चारही तिकिटे "confirm" मिळाल्याने घरातील लोकांच्या आनंदाला उधाण आले होते. पण 'आपण घरी नसताना आपल्या घरी चोरी झाली तर?' अशी पुसटशी भीतीहि  त्या लोकांना वाटली. शेवटी चांगल्या प्रकारे कडी-कुलुपे घालून सर्व नीट बंद असल्याची खात्री करूनच लोक निघाले.  
    प्रवास लांबचा होता, पण तोही पूर्ण झाला आणि लगीन घरी लोक पोचते झाले. विधी एका मागून एक चालूच होते, आगत स्वागत झाले. बरर्याच वर्षांनी मित्र भेटल्याने सगळे आनंदात होते. रिंगण करून गप्पा मारण्यात वेळ जात होता. कोण कुठे आहे? काय करतो आहे? कोणाला किती मूले आहेत? मूले कित्ती मोठ्ठी झाली (आपण किती म्हातारे झालो) अश्या मजेशीर चर्चा चालू होत्या. लगीन घरची सोय चांगली होती आणि कार्यक्रम सुद्धा उत्तम प्रकारे आखला होता अश्यातच दोन दिवस कधी गेले समजलेच  नाही. सगळ्यांचे फोन नंबर, पत्ते घेऊन परत भेटण्याचे नक्की करून मग "घरातील" लोक निघाले. जाताना एक मित्रकडे एक-दोन दिवस मुक्काम करण्याचा बेत होता. त्या प्रमाणे लोक मित्रकडे आले, बर्याच दिवसांनी मित्र,  परिवारा सकट आल्या मुळे यजमान खुश होते. त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने मोठ्या प्रेमाने पाहुण्यांचा पाहुणचार केला. 
          असाच मजेत एक  दिवस गेला तिसर्या दिवशीच "घरातील" लोकांचे परतीचे "confirm" तिकीट होते. आणि काळाचा आघात झाला घरातल्या लोकांचा "भ्रमणध्वनी" खणखणला घरा जवळ राहणाऱ्या एका गृहिणींचा तो फोन होता. "घरात, चोरी झाली होती!!!", "दोन दिवसांपासून घरातील light चालू आहेत, तुम्ही तर घरी नाही मग हे कसे झाले?".
           अनर्थ!! घोर अनर्थ!!!! "घरातील लोकांनी" इतरांना कुलूप लावायला सांगितले आणि फोन वरूनच पोलिसांना खबर दिली. सर्व जुळवाजुळव करून आणि "confirm" तिकीट cancel करून ते निघाले,
 पण नशिबाची पण थट्टा बघा ज्या गाडीने निघाले ती गाडी "नगरात" जवळपास सतरा तासांनी पोचली (जो प्रवास १०-१२ तासांचाच होता). आपल्या लाडक्या घराची अशी अवस्था झालेली बघून "लोकांच्या" अश्रूंचा बांध फुटला!!!!! पण जे गेले ते तर गेलेच!! वडिलोपार्जित पूजेचे साहित्य, जिव्हाळ्याचे दागिने सगळेच नदारद होते. 
       "घरातील" लोक आलेले पाहून इतर "मिळून-मिसळून" राहणारे लोक सुद्धा आले. "दार नीट लावून गेले नव्हतात का?", "हे तुमचं दार आहे न त्याची दिशाच चुकीची आहे, इथे अश्या घटना होणे स्वाभाविक आहे(???)", "तुमच्या कडे फार काही असेल असं वाटत नाही हो!!!", "अहो दागिने न
 नेहेमी locker मधेच ठेवावे", "घरात कुणाला तरी झोपायला सांगायचं न!!"
 "आता काई वस्तू सापडणार नाहीत बघा, मी सांगते आमच्या ह्यांच्या ओळखी आहेत पोलिसात पाहिजे तर हे शब्द टाकतील तुमच्या साठी(!!), मिळालं काही नशिबाने तर मिळेल!!!!!"
        एवाना "घरातील" लोकांचा "नशीब" ह्या शब्दाचा चांगलाच साक्षात्कार झाला होता. पोलीस आले, मोठा ताफा घेऊन आले!!! ताफ्यात "गोल्डी" नावाची काळ्या रंगाची कुत्री होती, घरात तिने चोरांचा वास घेतला, दरम्यान तिला सांभाळणारा पोलीस तिच्या "उत्कृष्ट" कामाचे अनेक किस्से घरातील लोकांना सांगत होता. हवालदिल झालेल्या त्या "बिचाऱ्या घरातील" लोकांकडे त्या कथा ऐकण्या पलीकडे काही गत्यंतर नवते.  त्या पाठोपाठ एक "finger print expert" येवून गेला, त्याने घरात अनेक ठिकाणी काळी पावडर लाऊन "finger prints" घेण्याचा प्रयत्न केला.
घरात आलेले चोर हे काही साधे नव्हते ते "सराईत गुन्हेगार" असल्याचे त्याच्या तपासात स्पष्ट झाले. 
      अश्या प्रकारे ते घर "वास्तुशांत" झाली तेव्हा सुद्धा जितक्या लोकांनी बघितले नसेल तितक्या लोकांनी बघितले. सगळ्या नगरात, इतका फौज-फाटा आला हि बातमी वेगानी पसरली, भेटायला येणार्यांचा ओघ निदान महिनाभर तरी चालूच होता, चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के 
रक्कम तर आल्या-गेल्यात गेली. 
        पण हा विचार कुणीच केला नाही कि त्या घरातील लोकांना काय वाटेल? "आपल्या घरात कुणीतरी आपण नसताना येऊन गेलं, त्या माणसांना आपल्या घरातली कुठली वस्तू  कुठे आहे हे  नाही माहिती आहे"  हि भावनाच भयंकर होती. घरातील लोकांना झोप लागत नसे. आणि जिव्हाळ्याच्या वस्तू तर गेल्या होत्याच, पण म्हणतात न "time heals" तसंच झालं आणि ते हळू-हळू सावरले. वस्तू सापडल्या कि नाही हा मुद्दा गौण झाला पण एक थोडी शिकवण देणारी गोष्ट मात्र सापडली.

Saturday 4 June 2011

परिक्षा

       जवळपास एक महिना झाला काही लिहिलं नाही कारण, "परिक्षा". आता वाटतं आहे चला झाली एकदाची आणि  झालीच कायमची कारण आता ते tension नसणार, ती धावपळ नसणार माझं M.Sc. झालं आणि परिक्षा सुद्धा.
      थोडी nostalgic झालीये मी पण मग विचार केला कि माझ्या वयाच्या 
जवळपास सर्वच जणांना हे exam blues जाणवत असणार. आपल्या  
आयुष्याचा महत्वाचा भाग ज्यावर कितीही लिहिलं तरी ते कमीच.
      जर्रा आठवा आपली पहिली परिक्षा अगदी बालवाडीतली, जेंव्हा 
परीक्षेचा अर्थ सुद्धा कळत नव्हता आईनी घोटून घेतलेल्या त्या कविता,
गोष्टी, एक ते दहा अंक हे सगळं डोक्यात घेऊन आपण बाईंच्या समोर 
जात असू  आणि आठवलं तर आठवलं नाहीतर काहीतरी अचाट उत्तरं
देऊन "मी जाऊ?" म्हणून पळून येत असू . तरीही शेरा "पास". आज आपला result आहे म्हणजे काय हे सुद्धा नं कळणार  वय. फक्त आता 
सुट्टी लागणार आणि आपण आजी कडे जाणार हे माहिती असायचं.
      पुढे चौथीत पोहोचे परेंत scholarship नावाच्या प्रकारची परिक्षा असते 
आणि ती दिली तर "फार" फायदा होतो असं आपण कुणाकडून तरी 
ऐकलेलं असतं, मग आपण रडत कढत का होईना पण त्या परीक्षेला 
बसतो ( ह्यातल्या "आपण" ह्या सर्वनामा वर कुणाला आक्षेप असेल तर माफी असावी कारण माझी धारणा ह्या परीक्षे बद्दल अशीच आहे). त्याच्याच सोबत शाळेच्या परीक्षांना आपण समर्थ पणे तोंड दिलेलं असतं .नाही म्हणायला  कुलकर्णी बाईंनी विचारलेला "तेरा" चा पाढा आणि लेखी परीक्षेत नं आठवलेला विज्ञानाचा प्रयोग आणि त्याचं नं आठवले पण झाकण्या साठी मी लिहिलेला अगम्य,अशक्य असा नवीन प्रयोग, जो वाचून त्या बाई सगळं विज्ञान विसरल्या असतील, हे अनुभव गाठीशी होतेच( इथेच कुठे तरी मी Science ला जाणार असं वाटायला हवं होतं नाही का?) 
      तेव्हा परिक्षा आहे म्हणून माझी आई लवकर उठायची अर्थातच माझी पण झोप मोड व्हायची मग "कारणे द्या","जोड्या लावा","रिकाम्या जागा भरा" ह्या तत्सम प्रश्नांची उजळणी व्हायची, परीक्षे हून आल्यावर कुणी विचारवं "काय मग कसा होता paper?" ज्यावर आपण "छान होता, मला सगळं आलं!!" हे उत्तर देऊन मोकळं व्हावं आणि आईनी घेतलेल्या उलट तपासणीत वेगळ्याच रिकाम्या जागा वेगळ्याच शब्दांनी भरल्या आणि जोड्या चुकीच्या लावल्या हे  निदर्शनास यावं असं माझं बरेचवेळा झालंय. 
"पर कुछ नहीं, चलता है! अगली बार कर लेंगे, उसमे क्या?" ह्या वाक्यांनी माझी नेहेमी साथ दिली.
         पाचवी, सहावी  पासून आपला अभ्यास आपणच करायचा हा दंडक लागला आणि परीक्षेच्या काळात माझा alarm मीच लावू लागले. मग मराठी च्या पेपर च्या आधी व्याकरणाचे नियम, इंग्लिश चे शब्दांचे अर्थ आणि इतिहास, भूगोलाची सुरेख सफर माझी मलाच करावीलागे. त्यातही जो विषय नावडता त्याच्या पेपर च्या वेळी अभ्यास करतांना प्रचंड झोप येई मग परिक्षा hall मध्ये उत्तरं आठवतांना होणारी तारांबळ, "ह्याचं उत्तर तेच नं जे मी खिडकीत बसून अभ्यास करतांना वाचलं होतं", नाहीतर उत्तर आठवलं नाही तर मग "आता काय ठोकू बरं?" असा चाललेला स्व-संवाद जो अगदी आता आता परेंत कायम होता. अश्याच नववी परेंतच्या परिक्षा गेल्या.
         आणि मग आली "परीक्ष्यांची राणी", "दहावी" आहाहा काय तो माज!
"दहावी ची मुले" असा  एक वेगळा समाज असावा अशी त्या मुलांना वागणूक मिळते. सगळे नियम वेगळे, अचानक काय झालं आपल्या आजूबाजूच्यांना हे आपल्याला कळतच नाही. सावराव तोवर पहिली तिमाही येते आणि रंग दाखवून जाते, "पहिली बोर्डाची परिक्षा आहे बरं, चांगली दे. नाही म्हणजे इथे confidence मिळाला तर मग फारच चांगलं होईल हो!","दहावीची परिक्षा हा आपल्या आयुष्याचा turning point असतो बरं बाळा!!, चांगली दे" ह्या आणि अश्या अनेक वाक्यांनी आपण भांबावून जातो आणि जमेल तसा अभ्यास करतो. आपल्या अभ्यासाची प्रगती, अधोगती क्लास मध्ये सतत चालणाऱ्या परिक्षा दाखवत असतातच.
prelims च्या दिव्या मधून निघून आपण आपल्या पहिल्या वहिल्या PL 
परेंत पोचतो. तेव्हा काय बडदास्त ठेवली जाते लोकहो!! हातातच ताट काय,
वेळेवर चाहापाणी काय वा वा वा !!! पण हे सगळं ह्या साठी कि "चांगले मार्क मिळव राजा, बर्याच अपेक्षा आहेत तुझ्या कडून". माझा स्वतःचा 
दहावीच्या परीक्षेचा अनुभव काही असा होता, पहिला पेपर मराठीचा  तशी विषयाची भीती वगरे फार न्हवती पण नवी जागा नवे लोक ह्यांच्यात परीक्षा देण्याचा पहिलाच अनुभव. बरं जाताना पेन, पेन्सिल इ. इ. सोबत 
"Hall Ticket" नावाचा प्रकार प्रथमच सोबत न्यावा लागणार होता. 
परीक्षा केंद्रावर एक तास आधीच पोहोचा वगरे वगरे गोष्टींचा भडीमार,
ह्या गोष्टी सांगताना लोक नेमक्या "अहो त्या राणेंची गाडी पोराला परीक्षेला नेता नेता बंद पडली हो!! मग काय तारांबळ, रिक्षा शोध न बस शोध शेवटी उशीर झालाच पोचायला, तुम्ही आपलं लवकर निघा हो, एक आपला अनुभव सांगितला!!"  अश्या आठवणी आणि अनुभव लोक सांगतात.   
 कामवाल्या मावाशीपासून ते अगदी  त्या टोका वर राहण्याऱ्या  काकांपरेंत सगळ्यांना मला शुभेछा देण्याची आणि "अनुभव" सांगण्याची भारी हौस.
center वर पोहोचे परेंत "आपली गाडी बंद तर नाही ना पडणार?"," आपला नंबर नक्की इथेच असेल ना?" असे एक ना हजार प्रश्न. उत्तरं मिळतात आणि माझी स्वारी परीक्षेला पोचते, पेपर बरा असतो त्यामुळे tension कमी होतं अशीच सगळी परीक्षा संपते आणि तीन महिन्याची मोठ्ठी सुट्टी लागते. ह्या सुट्टीमध्ये सुद्धा परीक्षेच्या भुताने माझी पाठ सोडली नाही,
मी परीक्षे ला पोचले आणि center कुठेतरी दूर डोंगरावर होतं अशी स्वप्नं 
मला नेहेमी पडायची result जवळ येतांना तर विचारू नका त्याच दिवशी 
पेपरात भविष्य "अनिष्ट घटना घडेल(?)" असे आल्या वर सांगा बरं काय अवस्था झाली असेल माझी. थोड्या फार फरकाने अशीच माझी बारावी सुद्धा गेली आणि "बोर्डाच्या दोन दोन परीक्षा आपण पास झालो!!" म्हणून मला स्वतः बद्दल फारच अभिमान वाटू लागला.
          पुढे B.Sc. ला फार परीक्ष्यांची सवय  झाली म्हणून  कि काय फार त्रास झाला नाही. नाही म्हणायला chemistry च्या practical मध्ये केलेली 
गडबड आणि चुकवलेली readings गालबोट लावायला पुरेशी होती. semester पद्धतीशी पहिली ओळख आणि मग गाढ मैत्री इथेच झाली.
        M.Sc. ची परीक्षा मात्र सर्वांपेक्षा अगदी वेगळी, तुमचं अख्खं notebook जरी पाठ असेल तरी परीक्षेला बसल्या वर," मी काही अभ्यास केलाय कि नाही?" असं वाटायला लावणारी परीक्षा मी इथे अनुभवली.
घरा पासून दूर hostel मध्ये राहून नवीन जागेवर अभ्यास करून परीक्षा देण्याचा thrilling अनुभव मी ह्या परीक्षे मुळे घेतला. कधी नं बघितलेले 
मार्क ह्या परीक्षेनी मला दाखवले आणि त्यातून काय आणि कसं शिकावं हे सुद्धा दाखवून दिलं. ह्याच परीक्षेत अनेक वेळा अश्या सुद्धा आल्या कि पेपर लिहिता लिहिता मी आपल्याला किती मार्क मिळतील ह्याचं गणित मांडत बसले. त्या नुसार मग A सुटतो आहे का B,C वरच समाधान मानावं   लागणार कि अजून काही दिव्यं बघावं लागणार आहे ह्याची तयारी करावी 
हे clear व्हायचं. 
         सर्वच परीक्षांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे "option" ला टाकणे.
त्याच्या शिवाय परीक्षा होतंच नाही. मग पेपर ला गेल्या वर "अरे मी त्या पाचव्या chapter मधले दोन proofs नाही केले यार!!","मी तर तो अर्धा chapter option ला टाकला आहे", अश्या गप्पा चालू असतात मी ह्या सगळ्यात पडत नाही कारण मला एव्हाना हे लक्ष्यात आलं असतं कि हे लोक ज्या पाचव्या chapter बद्दल बोलतायेत," तो मी अख्खा option ला टाकला आहे!!!!". " पेपर च्या एक तास आधी पासून अभ्यास बंद करावा" हे मी अगदी तंतोतंत पाळते (M.Sc. ला एकाचा अर्धा झाला).
       काही प्रकार च्या परीक्षा आहेत ज्याचा मला अगदी मनापासून तिटकारा  आहे आणि त्या म्हणजे "Entrance Exams", ह्यांची तर्हा  वेगळी.
पण जास्त भाव ह्याच खातात.
       आता माझ्या किंबहुना माझ्या वयाच्या सर्वच लोकांच्या आयुष्यातली 
हि अशी परीक्षा संपली आहे. ज्या वर्ग बरोबर आपण बसलो आणि वर्षभर  शिकलो   त्या वर्गातल्या  सगळ्यांसोबत  बसून  आपण कदाचित  आता परत पेपर लिहू शकणार नाही. परीक्षे आधी आणि नंतर ची मजा, thrill  आता आपण miss  करू कारण आता आपले सगळयांचे पेपर वेगळे वेगळे आहेत "portion" वेगळा आहे आणि "option" ला टाकता येणार नाही.......     
                     
              
           
                                   
             
                               
          
                     
         
      

Monday 25 April 2011

नाशिक- पुणे- नाशिक

     मागच्यावर्षी पुण्याला शिकायला गेल्या पासून मी हा प्रवास record  तोड वेळा केला असेल. लोक blog मध्ये त्यांनी बघितलेल्या सुंदर ठिकाणाबद्दल,अविस्मरणीय प्रवासाबद्दल लिहितात. पण त्या सगळ्या पेक्षा अगदी विपरीत हा प्रवास रटाळ, कंटाळवाणा आणि बोरिंग ह्या तिन्ही
 शब्दांना पुरून उरणारा आहे. प्रवास तसा
आहे ५-६ तासांचाच पण वर लिहिल्या प्रमाणे अंत बघणारा.
साथीला एखादं पुस्तक किंव्वा कानात गाणी असतील 
 तर  ठीक नाहीतर मग तुमचं काई खरं नाई. ह्यावर तुम्ही 
विचाराल, "लोक असतात गाडीत त्यांच्याशी नाई का बोलता येत?"
येतं कि, नाई कोण म्हणतंय पण बरेचदा तेही ह्या रटाळ 
प्रवासाने हैराण झालेले असतात. म्हणजे कसाय नं 
सुरवातीला बरर्याच गोष्टी होतात पण मग कंटाळा येतो हो!
पण काही लोक मात्र लई भारी असतात, अश्या
परिस्थितीत सुद्धा त्यांचा stamina टिकून असतो,
कधी कुठल्या काकू असतील तर त्या आपल्या
घरच्या लोकांच्या तक्रारी करतात तर काका "व्यवस्थे" 
बद्दल तक्रार करतात, सूर सारखाच असतो. समवयीन म्हणाल 
तर फार कमी बोलतात.  
बरं बाहेर बघावं म्हंटल तर अशी "विहंगम" दृश्य दिसतात 
             
  
 ह्या वर जर तुमचं मत असं असेल कि हि उन्हाळ्यातली 
चित्रं आहेत इतर ऋतूत परिस्थिती चांगली असेल तर 
उत्तर आहे "नाही". म्हणजे दोन चार पानं जास्त लावून 
टाका झाडांना अजून फारसा काही फरक नसतो. 
"टकले डोंगर" प्रकार इथे विपुल प्रमाणात बघायला मिळतो.
  
मला काय वाटतं इथल्या traffic मुळे त्यांची अशी अवस्था 
झाली असेल. खरंच प्रचंड traffic असतं हो या रस्त्यावर.
बस सोडून अजूनही साधनं आहेत येण्याजाण्याची,
आता हेच बघा ना.            
    
                
       हा प्रवास आता इतका अंगवळणी पडला आहे न कि
कोणतं गाव आलं हे नुसत्या त्या गावच्या काही दुकानांच्या 
पाट्या बघितल्या कीच लक्षात येतं. "आळेफाटा ट्रोमा सेंटर" 
बघितल्या वर  "आळेफाटा" आलं हे समजावं, दुकानांची
अफाट गजबज म्हणजे "मंचर",तर "प्रवरा" शब्द नावात असलेली 
दुकानं "संगमनेर" ला असतात. तीच  प्रवरा नदी सध्या काही 
अशी दिसते आहे.


असो, मध्ये भूक लागल्या वर आपण "दौलत" ची पाटी शोधावी 
 तर "विट्ठल कामत" सुद्धा "छान" ची खुण करत 
आपल्या "Vitthal Kamat's" ची ad करत असतात.
ह्या वळणावर आता "काठीयावाड" चा board दिसेल                   
असं वाटतं आणि तो दिसतोही, तसाच "गारगोटी" संग्रहालयाचा 
  board कधी पासून त्याच वळणावर ताटकळत उभा आहे.
पुढे पुण्या जवळ जातांना महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे
नवी बांधकामं आणि अर्धवट अवस्थेतले  flyovers ,
"बांधकाम चालू आहे" ची पाटी सांभाळत. ह्या दरम्यान
"hot chips" चा देशी अवतार "गरम वेफर्स" आणि
"मास्तर नाश्ता सेंटर" आपले वेगळेपण जपत असतातच.  
         हि तर झाली पाट्यांची  कथा, बाकी काही गोष्टी ज्या   तुमचं लक्ष वेधू शकतील त्या म्हणजे मध्ये लागणारी
 गावं. तसं गावांत काय मजेशीर असणार म्हणा पण 
त्यांचा "typical" पणा त्यांना मजेशीर बनवतो. दुकांनांची 
गजबज,नावांची hordings ह्या त्यातल्याच काही गोष्टी. 

    
   घराबाहेर वाळू घातलेली गादी आणि वर फडकणारा 
झेंडा सुद्धा 

 
तुम्ही आकोडा टाकून वीज घेण्या बद्दल ऐकलं असेलच ना 
हा बघा त्याचा एक नमूना 




तर असं मजल दरमजल करीत तुम्ही नाशिक किंव्वा पुणे 
येथे पोहोचता. 

      ५-६ तासांच्या रटाळ प्रवासला अलविदा करून पुन्हा
आपल्या कामाला जाता परत तोच प्रवास करायचा असतो ना.


टीप: ह्या blog मधले सगळे फोटो मी काढलेले असून  कुठूनही
"ढापलेले" नाही.

          
  
  
 

Saturday 9 April 2011

Morning Walk

       काहीतरी व्यायाम करायला पाहिजे नाई का stamina  राहायला हवा ना
दिवसभर धावपळ  करायला मग Morning Walk हा  त्या वरचा उत्तम   उपाय. 
     आमच्या विद्यापीठाचा परिसर म्हंजे सकाळी भटकंती करायसाठी अगदी योग्य.
सकाळी ताजा ताजा "लोकसत्ता" घेऊन माझी स्वारी निघते.   
काही दिवसांपूर्वी परेंत माझे headphone सुद्धा असायचे साथीला पण आता तेही 
कानात वारा गेल्या प्रमाणे चित्र-विचात्र आवाज काढू लागल्या मुळे  मी
त्यांना आता विश्रांती दिली आहे. मग  background music  
देण्याचं काम आता झाडांची पानं  आणि त्यावरचे पक्षी करतात.
फिरायला जातांना तरी माणसाने शहाण्या सारखं वागावं ना पण खोड म्हणा 
कि अजून काही पण प्रत्तेक गोष्टीमध्ये विसंगती शोधायला मला फारच
 आवडतं आणि तेच मी इथे सुद्धा करते.
         विद्यापीठाच्या  परिसरात बरेच लोक Walk साठी  येतात, त्यातले बर्रेच 
स्कोडा Octavia  आणि अश्याच  काहीश्या नावाच्या 
गडयामधून  येतात. त्यांचं आजीचं वय आणि नाती सारखा hair cut 
पचनी पडणं तसं जरा अवघडच पण होते मग सवय हळूहळू (मला
झालीये आता). श्रीमंत माणसाच्या श्रीमंतीची आणखी एक निशाणी 
म्हंजे त्यांचं  विदेशी  breed चं कुत्रं. त्या सुंदर हिरवळीवर  खेळणारं
ते  कुत्रं दिसतं फारंच गोंडस  पण असतं अंमळ चक्रम. हो आणि 
नावा बद्दल म्हणाल तर ह्या कुत्र्यांची नावं Jimmy,Tommy,
Rocky इ. इ. तर असतातच. अगदी कुणाशीही आपल्या कुत्र्यानं 
खेळलेलं मालकाला आवडत नाही आणि सगळ्या प्रकारच्या 
माणसांच्या पायाची चव घेतल्या वाचून कुत्र्याला राहवत नाही. 
मग oh baby!! no no no  don't do that अश्या प्रेमळ orders 
मालक सोडत असतो आणि कुत्रं त्या पाळत नसतं.
     इथे येण्याऱ्या जवळपास  सर्वच लोकांना सर्व प्रकारची योगिक 
आसने येतात अशी माझी ठाम समजूत आहे. तुम्हाला माहित असलेल्या 
किव्वा येत असलेल्या आसना पेक्षा निदान शेर भर तरी जास्तच आसने (का चित्तथरारक प्रदर्शनं) मी इथे बघितली आहेत. आणि हे लोक हे प्रकार अगदी सफाईदार पणे करतात असं मला तरी वाटतं.
अजूनही काही व्यायाम प्रकार आहेत ज्याला laughter therapy 
म्हणतात, हा व्यायाम प्रकार केल्या नंतर ह्या लोकांचे चेहेरे बघितले कि आपल्याला नक्कीच हसू येतं. रोज सगळी औषधं वेळेवर घेणारे हे
लोक हा हसण्याचा डोज पण नं विसरता घेतात,कोण जाणे दिवसभर
वेळ मिळेल नं मिळेल.
        सुंदर वातावरण पुष्कळ लोकांना इथे आकर्षित करतं. विद्यापीठाच्या इमारतीच्या पुढची आणि मागची बाग फारच सुंदर आहे. पुढे एक कारंजा आहे ज्यातून फार खास मौक्यानाच पाणी येतं.
दिल्ली ६ मध्ये कारंज्यावर "मस्साकली"  बसते इथे "पारवे" बसतात.
झाडं पुष्कळ असल्यामुळे अनेक प्रकारचे पक्षी दिसतात, फसलात नं
मी  कावळ्या चिमणी   बद्दल बोलत नाईये लोकहो!!!!
अन्य प्रकारचे पक्षी बसतात जे सुर्यानारायानाच्या साक्षीने इथे
"अभ्यास" करायला येतात असो.
     विदेशात म्हणे sun bath नावाचा एक प्रकार असतो इथे मी असा एक प्राणी बघितला आहे जो ह्या "sun bath " चा पुरेपूर आनंद घेत असतो  आणि  तो आहे "गावठी कुत्रा" ह्या हिरवळीवर निदान १०-१५ तरी गावठी कुत्री असतील सकाळी त्यांची समाधी लागली असते
आहाहा विलक्षण शांतता असते त्यांच्या चेहेऱ्यावर कसली चिंता नाही
काही कटकट नाही एकदम tension free असतात ते.
       एक आजोबा येतात इथे इथल्या खारुताई, मैनाताई साठी खाऊ
घेऊन प्रत्तेक झाडाच्या ढोलीत प्रत्येकासाठी खाऊ असतो.
मला वाटतं हा माझा Morning Walk  सुद्धा माझ्या साठीचा एक खाऊ आहे जो मला दिवसभर पुरतो आणि दुसऱ्या दिवशी मला
पुन्हा स्वतः कडे बोलावतो  आणि मी जाते पण इतकी मजा रोज कोण miss करणार?
                     
                                  

Tuesday 5 April 2011

पहिली post

      आपला पहिलावहिला  blog  त्याची पहिलीवहिली  post  काय असावी ह्या बद्दल मला तरी वाटत कि प्रत्तेक   blogger   विचार करत असणार. तसाच तो मीही केला पार डोकं फिरे परेंत केला मग विचार केला कि हाच  चांगला विषय होऊ शकतो...!!!
     काहीतरी लिहायला लावणारे प्रसंग आयुष्यात अनेक येतात, ते लेखन कधी उस्फूर्त  तर कधी compulsary अश्या स्वरुपात असतं.
शाळेत मराठी चे निबंध,  काहींना कंटाळवाणे तर काहींसाठी  तेवढाच प्रकार एक चांगला वाटणारा ( अर्थातच मी दुसऱ्या  category मध्ये  येते).
पण आपले हे लेखानाविष्कार फक्त शाळेतल्या 
कुलकर्णी बाई किंवा मराठे सर म्हणा फार तर ,ह्यांच्या परेंतच

जाणार ह्याची खात्री  असायची .
    आता मात्र surf  करतकरत  कोणीही तुमचा  "लेखानाविष्कार"  बघू शकतो. त्यावर comment पण करतात म्हणे लोक (ह्यावर comment 
द्यावी हि अपेक्षा आहे). मग अशी आपली पहिली post  चांगली घासून
पुसून लक्ख नको का  करायला?
     पहिल्या प्रथम लिहिणाऱ्या माणसाच्या डोक्यात हजारो विषय पिंगा घालत असतात. जसेकी, ते त्या दिवशी सुचलेल्या विषयावर लिहू का?  परवा फारच भन्नाट कल्पना आली होती तीच लिहावी,
नाहीतर मग असंच करू का कि आत्ताच्या " Latest Events"  बद्दल लिहायला सुरवात करावी  एकन  अनेक.... मला वाटत लोक आपल्या फार जवळच्या  विषयाला प्रथम हात घालत असावेत आणि मग गाडी रुळावर येत असावी.
     पहिली post  लिहितांना अजून काही भारी कल्पना माणसाच्या मनात येत असाव्यात जसेकी लोक माझा  blog  वाचतील  त्यांना तो फार आवडेल (नाही आवडणार अशी कल्पना माझ्या मते फार कमी लोकाना शिवत असावी)
  मग ते फारच मस्त comments देतील and so on.....    
     हे सगळे विचार मनात असताना पहिली post  publish होते आणि काहींच्या अपेक्षा पूर्ण होतात तर काहींच्या पूर्ण  व्हायला थोडा   
आवधी  अजून लागणार असतो पण मग माणसाला त्या excitement ची " सवय"  होते आणि विषय सुद्धा सुरळीत सुचायला लागतात
आणि तो एक नियमित blogger  बनतो.
      तर वाचक मित्रहो मीपण  कमी अधिक प्रमाणात असाच विचार केला आणि माझी  पहिली post  लिहिली आता पुढील गोष्टी तुमच्या हातात. एक नवीन blogger  तुमच्या comments ची वाट बघते आहे.....


      

 
 

श्री गणेशा

         नमस्कार वाचक मित्रहो......
   तसा मी माझ्या blog  चा श्री गणेशा  कालच करायला हवा होता पण जर्र्रा उशीर झाला आणि साडेतीन मुहूर्तावर माझा blog  सुरु 
झाला  नाही, असो. 
    तर  हा माझा  blog  म्हणजे  ह्या महासागरात अजून एका थेंबाची वाढ, ह्या मध्ये शीर्षका प्रमाणे मी बरर्याच  गोष्टी बद्दल "मला काय वाटतं" ते लिहीन. हे लिखाण कधी गंभीर, कधी विनोदी तर कधी मार्मिक असू शकतं. तर हि झाली  blog  ची रूपरेषा. मी ह्या blogging च्या विश्वात नवीन असल्या कारणाने लिखाणात जर काही चुका झाल्या तर त्या खुल्या दिलाने माफ कराव्यात हि विनंती.