माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Tuesday 12 May 2015

एक बातमी.......

           कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु  झाला  असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि एक धक्कादायक बातमी समजली, आमच्यातली एक… बातमी देणारी…तीच एक बातमी झाली होती…ती गेली होती…एका भयानक अपघातात तिचा जीव गेला.…
            निदान माझा तरी ह्यावर बराच वेळ विश्वास बसला नाही, नाशिक बाहेर असल्याने सगळी शोधा - शोध करून बातमी confirm केली, तोवर fb वर पोस्ट आदळत होत्या…. ती खरच आम्हाला सोडून गेली होती …
              प्रियंका तुझ्या सोबत शाळेत, तुझ्या वर्गात शिकलेल्या सगळ्यांची हीच अवस्था होती काल, computer screen समोर बसलो होतो आम्ही पण डोक्यात तुझेच विचार पिंगा घालत होते…. राहून राहून डोळ्याच्या कडा पाणावत होते, आत्तासुद्धा तेच होतंय.…तूच बातमी होशील असं आमच्या मनातही नाही आलं ग.…. 
         रोज पेपर मध्ये अपघाताच्या बातम्या वाचतो, मरण पावलेले जीव कोणाचे कोणीतरी असतात, बातमी देणारे निर्विकार पणे ती बातमी छापतात आणि आम्ही वाचणारे सुस्कारे सोडून पेपर गुंडाळून ठेवतो, कालचा पेपर महत्वाचा वाटला मला…
      off period मध्ये कवितांसाठी फ़ेमस, आम्हाला तुझ्या कविता समजल्या नाहीत फारश्या कधी, पण शाळेत कोण काय होणार ह्यावर मी लेखिका होणार हे तुझं  ठाम उत्तर, सगळ्या शिक्षकांना सुद्धा तुझ्या बद्दल वाटणारा अभिमान, मराठीवर तुझं प्रेम, तुझी हसरी छोटी मूर्ती…… हे सगळं डोळ्यासमोर तरळतय आज.
         आपण सगळ्यांनी सोबतच सुरवात केली, पण career च्या बाबतीत तू आमच्या फारच पुढे निघून गेलीस, आम्ही बापुडे तुझे नसिरुद्दीन शाह आणि अनुष्का शर्मा सोबतचे फोटो पाहूनच थक्क होत असू, "अब इसकी तो निकाल पडी !!" असा विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आला. इतक्या कमी वयात विशाखा पुरस्काराला तू गवसणी घातलीस, अजूनही बरेच पुरस्कार तू मिळवलेस, इतक्या छोट्या आयुष्यात इतकी मजल मारलीस!! पेपर च्या छोट्या बातमी पासून स्वतःच्या column परेंत पोचलीस , Bravo!!
        तसं  पाहिलं तर माझा तुझा  शाळेनंतर  फारसा काही संपर्क नवता, नाहीच म्हणा. फक्त HPT मध्ये सोबत होतो, ते सुद्धा arts आणि science वाल्यांच्या वाकड्या मुळे आपला फारसा काही contact नवता.  शाळेत जरी नाही तरी HPT मध्ये तुला तुझ्या frequency चे लोक भेटले बहुतेक. तिथे तू आयोजित केलेला G.A. न वरचा कारेक्रम आम्ही अनुभवला. फारच झटत होतीस तू जणू फार काही achieve करायचं होतं आणि वेळ कमी होता…….
        पण तुझी प्रगती ख्याली खुशाली fb वर समजत होती…. तू फारच active होतीस तिथे, आवर्जून कोणाच्याही post वर like करणे, स्वतः कितीतरी गोष्टी टाकत राहणं , तुझं आयुष्य होतंच happening!!
ज्या लोकांना तू भेटलीस त्यांना आपल्यातली चमक दाखवलीस…Its evident from your fb page now...
           माझ्या मागच्या blog post वर तू comment केली होतीस, ती महत्वाची ह्यासाठी होती कारण लिखाणातल्या धंद्यातल्या कोणीतरी वेळ काढून माझा blog वाचला आणि comment केली. आमच्यासारख्या हौशी लेखकांना हे प्रोत्साहन पुरे आहे.
        तुझ्या वर लिहिणारे तुला ओळखणारे आज हजारो लोक आहेत, ते कदाचित माझ्या पेक्षा खूप काही लिहू शकतील पण शाळेतली वर्गमैत्रीण म्हणून मला तुझ्या बद्दल आदर होता आणि राहीलच…
       २००४ ची विद्या प्रबोधिनी ची दहावीची batch तुला खूप miss करेल.…… आमची माई होतीस तू……

Monday 16 March 2015

नोकरीच्या निमित्तानं - भाग २ Tablet Training

         पहिल्या भागाला  चांगला प्रतिसाद दिल्या बद्दल शतशः धन्यवाद!!  २ वर्षानंतर लिखाणाकडे परत फिरणे सार्थक झाले!! दुसऱ्या भागात काय लिहिणार अशी तुमच्या सोबत मलाही उत्सुकता होती, हो कारण अनुभव बरेच असतात त्यातला कोणता लिहावा हा प्रश्न आहे. 
         असो, तर माझ्या नोकरीत माझ्या orientation नंतर वेळ आली खऱ्या कामाची. मागे म्हणल्या प्रमाणे आमची संस्था ह्या भागातल्या किशोरवयीन मुलींना सक्षम करते, जेणे करून त्या अजून काही वर्ष शाळेत जाऊ शकतील आणि त्यांची लग्नं अगदी कमी वयात  होणार नाहीत. ह्या कामाला बऱ्याच प्रमाणात यश आलं पण  अजूनही मोठा पल्ला गाठायचाय. 
       ह्याचाच भाग म्हणून मुलींना tablet computer शिकवणे आणि गाव पातळीवर त्याचं वाटप करून त्यांना त्याचा उपयोग होईल असे बघणे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मी ह्या प्रशिक्षणाशी आपोआपच जोडले गेले. सुरुवात होती काय शिकवायचं इथून, आमच्या पुण्याच्या office मधल्या एकीनी तो प्रश्न सोडवला. पण त्यात अजून काय टाकावं ह्यावर मला विचार करायला सांगितलं गेलं. 
       ह्या मुलींना काय tablet ची गरज? असा प्रश्न आपल्या मनात सहज येतोच. जरा चित्र डोळ्यासमोर आणून बघा, गावात एका कट्ट्यावर काही मुली गप्पा करत बसल्या आहेत आणि आता विचार करा कि त्यांच्या हातात tablet आहे!! मजेशीर आहे न?  हो, पण हे मजेशीर चित्र सत्यात उतरवायची संधी मला मिळाली!! म्हणून मीही जरा ह्या मुलींना काय लागेल, काय समजेल आणि काय आवडेल ह्याचा विचार करू लागले.… 
        उद्देश हा होता कि त्यांना tablet चा  वापर फोन म्हणून आणि काही documents बनवण्यासाठी म्हणून   वापर करता यावा आणि internet त्यावर त्यांना वापरता यावं. बऱ्याच चर्चेनंतर आम्ही तीन दिवसांच्या प्रशिक्षणावर शिक्कामोर्तब केलं.
        ह्या  आधी मी जवळपास ३ वर्ष teaching मध्ये होते. त्यामुळे शिकवणे हि क्रिया माझ्यासाठी  नवीन न्हवती. तुम्ही चांगले शिक्षक असाल तर  कोणतीही गोष्टं शिकवू शकता.… छान वाटत न वाचायला…पण इथे मामला प्रचंड कठीण होता!! आजवर मी ज्या मुलांना शिकवलं ती एकतर वयानी जर मोठी होती आणि मुख्य म्हणजे  शहरातली होती आणि मला त्यांना statistics शिकवायचं होतं.
         ह्या मुलींची थोडी पार्श्वभूमी सांगायची म्हणजे ह्या शेतमजूर, इतर मजूर वर्गात काम करणाऱ्या माय बापांच्या पोरी, ह्यांची गावं मागच्या लेखात सांगितल्या प्रमाणे डोंगरा पलीकडे, शिक्षण इयत्ता ६ वी ते १२वी. पहिली batch पाहूनच मी थक्क झाले. एकूण ५० मुली, सगळ्या खेडोपाड्यातून आलेल्या…… हा वर्ग मी आजवर शिकवलेल्या सगळ्या वर्गांपेक्षा अगदी वेगळा होता. नाही म्हणायला माझा शिक्षकी खाक्या कामी  आला!! म्हणजे मुलींना गप्प करणे , रागावणे इत्यादी इत्यादी. थोडक्यात discipline चा प्रश्न सुटला!!
        पण खरं सांगू मुलींना शिकवतांना कसं होईल काय होईल हा यक्षप्रश्न अगदी विरघळून गेला ….  आम्ही दोघींनी मिळून हे training घेतलं. आणि खरोखर हि एक देवाणघेवाण होती, मी ह्या मुलींकडून शिकले आणि त्या बहुतेक tablet शिकल्या;-)
       ह्या वर्गात आलेले थोडे म्हणजे अगदी छोटे बरंका,  problem म्हणजे ह्या मुलींना tablet चालू कसा करायचा इथपासून सांगव लागे, त्यांनी तो जन्मात पहिल्यांदा पहिला होता, slide सुद्धा बोटाला धरून करवाव लागे , साधे साधे इंग्रजी शब्द त्यांना माहित नसत जे आपण अगदी बेमालूमपणे वापरतो, कधी कधी गोष्टी त्यांच्या कल्पनेच्या अगदी पलीकडल्या असत त्या उदाहरणाद्वारे सांगाव्या लागत, कधी कधी तर आमची शहरी मराठी बोली भाषा सुद्धा त्यांना जड जाई, त्यातल्या काही  इतक्या बुजऱ्या असत कि एक शब्दही  बोलत नसत, काही इतक्या खोडकर  कि अक्षरशः हाताला धरून जागेवर बसवावं लागे, त्या पैकी बर्याच जणींना  "internet" हि काय चीज आहे हे ठाऊक नवतं, फळ्यावर लिहिलेले इंग्रजी शब्द उतरवण सुद्धा दिव्य होतं त्यांच्यासाठी ………
        पण ह्या सगळ्या समस्या चुटकी सरशी सुटल्या, फक्त त्यांच्याशी मैत्री करता आली पाहिजे!! ती गोष्टं आम्हाला जमली आणि आमची गाडी सुसाट निघाली.….
      tablet चालू झाल्यावर त्यांच्या चेहेऱ्या वरचा आनंद अवर्णनीय होता!! wallpaper बदलून तर त्या प्रचंड खुश होत. बर्याच मुलींना ह्यात गाणी ऐकतात, फोटो काढतात हे माहित होतं, पण tablet वरून फोन लावला कि त्या मनापासून हसत, कुणाला तरी message पाठवला कि Everest सर केल्याचा आनंद होई त्यांना!!
     आम्ही ह्या मुलींना tablet मध्ये documents बनवायला शिकवले, ते save करतांना आपण एका path वर save करतो, हा प्रकार समजावतांना मला कपाटात ठेवलेले पैसे आणि त्यांची ठराविक जागा हे उदाहरण द्यावं लागलं…मजेशीर  आहे न !! ह्या मुलींनी आमच्या अपेक्षे पलीकडे जाऊन हे करून दाखवलं. तेव्हा एक शिक्षक म्हणून मला खूप समाधान मिळालं.
      फोटो आणि व्हिडियो काढणे म्हणजे तर पर्वणीच होती!! आम्ही काही मुलींना गाणी, नाटुकली, नाच करायला बोलवत असू, काही मुलींनी त्यांचा पारंपारिक होळीचा नाच करून दाखवला. पहिले बुजऱ्या वाटणाऱ्या पोरी मग थोड्या वेळाने अगदी DID मध्ये भाग घेतल्या सारख्या नाचत. स्त्रीभ्रूण हत्ये वर केलेलं नाटक  पाहून तर मी थक्कच झाले!!
      ह्यांच्या शाळांची एक गोष्ट मला फार आवडली, त्या शाळेत वेगवेगळ्या गाण्यांची एक वही बनवायला सांगितली. ती वही सर्व प्रकारच्या सामाजिक, देशभक्तीपर गीतांनी भरली होती. आणि एकूण एक मुलगी ती गाणी पाठ म्हणू शकत होती, आणि गाणी तर इतकी सुंदर कि ऐकतच रहावीत.
      इंटरनेट वर शेतमालाचा भाव पाहून ह्या मुलीना इतका आनंद झाला कि काय सांगू!! idea ची "नो उल्लू बनाविंग!!" हि जाहिरात त्यांच्या डोक्यात पक्की झाली….त्या तर स्वतःला त्या जाहिरातीतल्या मुलीच्या जागी पाहू लागल्या जी जमिनीचा भाव इंटरनेट वरून सांगते.
      हे जसे आमच्या training चे चांगले अनुभव तसेच काही डोळे उघडणारे आणि खडबडून जागे करणारे अनुभवही आले.  एक आकारावितली  मुलगी एक दिवस आली नाही, मी तिच्या न येण्याचं कारण इतर मुलींना विचारलं तर कळलं कि तिला बघायला मुलगा आलाय!!! मागाहून समजलं तिचं लग्न झालं.
         ह्या मुलींसोबत आशा कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देत होतो. ह्यांच्या सोबतही अनेक चागले वाईट अनुभव आले. काही अगदी प्रयत्न करत तर काही नुसत्या बसत. पण सगळ्यात धक्कादायक अनुभव म्हणजे एक आशा जिचा नातू ५ वर्षांचा होता आणि तिचं वय होतं अवघे ३५ वर्ष!!!! अजून एक आशा जी नेमकी माझ्या वयाची होती आणि लग्नाला १५ वर्ष झाली होती तिच्या… हे आकडे पाहून मला घेरी यायची बाकी होती. भारतातली शहरं आणि खेडी ह्यातला फरक नेमका ह्यातच आहे.
            पण ह्या सगळ्या भल्या बुऱ्या अनुभवात आमचं प्रशिक्षण संपलं. नंतर ह्शोब काढल्यावर समजल कि आम्ही २०० मुलींना tablet शिकवला!! काल गावाच्या बस थांब्यावर आमच्या प्रशिक्षणाचा फलक पहिला आणि उगाचच गर्व वाटला……


     
       

Friday 13 March 2015

नोकरी च्या निमित्तानं - भाग १ Orientation

            बरं…बर्याच दिवसांनी, अनेकांच्या रेट्यानं finally... मी लिहिती झाले!!  जसं बर्याच दिवसांनी कोणी भेटल्यावर आपण ख्याली-खुशाली विचारतो , सांगतो तसंच ; मी आता शिक्षकी पेशा सोडला आणि researcher झाले. थोडक्यात नवीन नोकरी धरली. नवी आहे म्हणून सगळंच नवल आहे. 
            आता मी एका सामाजिक संस्थे मध्ये आहे, हि संस्था औरंगाबाद जिल्ह्या पासून ६७ किलोमीटर अंतरावर एका खेड्यात  गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे, इथल्या आसपासच्या गावांमध्ये माता आणि बाल आरोग्यावर काम करते आणि मुख्य म्हणजे ह्या भागातल्या किशोरवयीन मुलींना सक्षम करून इथला मोठा प्रश्न म्हणजे बालविवाह ह्यावर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनी हि संस्था काम करते आणि तोडगा शोधते.      
            हे  वाचल्या वर कुणाला हा paragraph म्हणजे एखाद्या संस्थेच्या report चा भाग आहे आणि का कुणास ठाऊक हा report आहे कि काय अशी शंका यईल. पण नाही त्यामुळे इथूनच मागे फिरू नका!! हि माफक ओळख गरजेची होती म्हणून करून दिली. 
           तर…… जसं कोणत्याही शहरी माणसाला खेड्याची फक्त trip चं आवडते , आणि ती फक्त weekend लाच असावी किंबहुना असावीच असंच वाटतं तसंच माझंही  होतं (आता मी वीकेंड ला शहरात जाते). पण नशीब कशाला म्हणतात गड्या ? ते तुम्हाला कुठेही, अगदी कुठेही नेऊ शकतं. So I am here!! Demography आणि Social Statistics हे माझे आवडते विषय होतेच आणि म्हणून मीही आले. आल्या नंतर घरची, घरच्यांची, घरच्या जेवणाची  आठवण येणं आलंच, त्यात माझा काही काळ गेला. मला ज्या- ज्या म्हणून प्राण्यांची भीती वाटते ते सगळे इथे मुबलक प्रमाणात आहेत. पण मला माझी खोली आवडली आणि कामही म्हणून रहिले. 
         मी ज्या गावात आहे त्या गावाची खासियत सांगायची म्हणजे, इथे जवळपास ३ किलोमीटरच्या परिघात  ५ मशिदी, ६ मंदिर आणि २ चर्च आहेत आणि सगळे गुण्या गोविंदाने आपल्या आपल्या भोंग्यावर आपली आपली प्रार्थना लावतात. मागल्या आठवड्यात अखंड हरीनाम सप्ताह झाला, अजानची  चाल मला पाठ आहे आणि येशूची हिंदी- मराठी मधली गाणी ऐकयला छान  वाटतात. 
           असो, सगळ्या organizations आपल्या नवीन पिल्लांना orientation देतात,तसंच मलाही इथे देण्यात आलं. हा भाग माझा दृष्टीकोन बदलणारा ठरेल असं मला तरी वाटलं  नवतं पण थोड्याफार प्रमाणात का होईना तो बदलला. तशी मी सामाजिक कार्यात असलेल्या माय बापांच्या पोटी जन्माला आले, सामाजिक कार्य कशाशी खातात ह्याची जाणीव मला होती.  थोडक्यात हा family business मला चांगलाच ठाऊक होता! पण शहरात वाढल्यामुळे, फारसा कधी संबंध खेड्याशी आला नाही. तो अगदी जवळून ह्या orientation नि करून दिला; नाही म्हणायला लहानपणी मेळघाट च्या खेड्यात जिथे माझे बाबा काम करत, तिथे माझ्या आदिवासी सवंगड्या सोबत खेळत सुट्ट्या घालवल्या होत्या ; पण रम्य ते बालपण…
          orientation चा उद्देश नवीन आलेल्या माणसाला संस्थेच्या कामाची पूर्ण माहिती व्हावी  हा आहे. माझी पहिली orientation visit हि translator म्हणून झाली, संस्थेत आलेले विदेशी पाहुणे आणि मी सोबतच orientation ला गेलो. ज्या गावात गेलो ते मला शहरी भारतीय म्हणून आणि त्या विदेशी पाहुण्यांना Indian Village म्हणून चिरपरिचित असलेलं होतं. त्यात काहीही धक्कादायक नवतं, सगळं कसं अपेक्षेप्रमाणे. हा रस्ता आहे असे सांगावे लागेल असा रस्ता , रस्त्यावर फिरणारे गाई, गुरं , कोंबड्या आणि मुलं … मला हा प्रश्न नेहमी पडतो मोठी जनावरे सोडा पण आपली कोंबडी हि आहे कि ती, हे ह्या मालकांना कसं कळतं ? जाऊदे , तर ४ विदेशी पाहुणे, मी आणि संस्थेचे काही लोक अशी आमची वरात निघाली .
           विदेशी लोक पाहून आपण शहरातले जर थांबतो तर हे तर बिचारे खेडूत! जिथून जागा मिळेल तिथून ते डोकावत होते, वाटेत थांबवून, आपला smart phone दाखवून, "Photo sir , please na please" असं आपलं भाषिक कौशल्य पणाला लावत होते, बरं हे एक खेडूत अन दुसरे विदेशी त्यामुळे माझ्यासारख्या सुवर्णमध्या कडे  लक्ष द्याला कुणालाच वेळ नवता, मी फोटो काढले!! विशेष म्हणजे दोघेही एकमेकांसोबत अगदी उत्साहाने फोटो काढून घेत होते. हा कार्यक्रम पूर्ण वेळ चालू होता. मध्ये मध्ये एखादा विदेशी पाहुणा किंवा पाहुणी खेड्यातील शेळ्या आणि उघडी गटारं ह्याचं सौंदर्य निहाळत थांबे आणि मला त्यांना पुन्हा खेचत त्या गोष्टीचं कौतुक(?) करून  त्यांना वाटेला आणावं लागे.
          हा प्रकार पाहून मला आमच्या घरी आलेल्या एका विदेशी पाहुणीची आठवण झाली, मी अगदी पहिली दुसरीत असतांना ती  आमच्या घरी आली होती.  Sandra तिचं नाव! आपल्या बाबांपेक्षा कोणी उंच असूच शकत नाही असं मला तोपरेंत वाटे, पण ह्या Sandra ने तो भ्रम दूर केला. इथून तिथून सगळे गोरे सारखेच दिसतात, ती आली तेव्हा आमच्या कडे सुद्धा अशीच झुंबड उडाली होती.
         ह्या लोकांना गाव दाखवत मी सुद्धा ते पाहत होते, शेवटी statistician कडे येणारा data आला कुठून? हे जाणून घेणं सुद्धा खूप मजेशीर होतं. त्या प्रत्येक data point च्या मागे एक गोष्ट आहे ह्याची मला जाणीव होऊ लागली. त्या विदेशी पाहुण्यांची जेवणाची वेळ झाली आणि आमचं orientation संपलं
         पुढे मला एकटीला एका सहलीला नेण्यात आलं, हो माझ्यासाठी ती सहलच होती इतरांसाठी कामाचा भाग. एकाच visit मध्ये ३,४ गावं पूर्ण करण्याचा plan होता. हि visit चालू झाली संध्याकाळी ४ वाजता आणि संपली रात्री ९ ला.  ह्या visit दरम्यान मी निखळ नैसर्गिक सौंदर्य काय असतं हे पाहिलं, खरच इतका सुंदर सूर्यास्त आणि इतका picture perfect चंद्र मी कुठेच नाही बघितला. आपण शहरातले लोक पैसे खर्चून trip ला जातो, जमत नसली तरी फोटोग्राफी शिकून मोठ्ठा कॅमेरा घेतो आणि फुटकळ गोष्टींचे फोटो काढून facebook वर share करतो, असेच काही खुशमस्करे like आणि  comment करतात, त्यावर खुश होतो. 
          पण खरा चंद्र आणि सुर्य हा ह्या खेड्यात बघावा. आणि तो हि फक्त आपल्या डोळ्यांनी, आपल्यासाठी!! facebook च्या post जुन्या होतील पण तुमच्या मनातला चंद्र कधीही मातणार नाही.
         आपण लहानपणा  पासून डोंगर पलीकडल्या आटपाट नगराची  गोष्ट  ऐकत आलोय, जेव्हाही प्रवास करतो तेव्हा दूरचे डोंगर पाहून वेगवेगळ्या गोष्टी मनात येतात, पण इथे कोणी राहत असेल अशी कल्पना सुद्धा येत नाही आपल्याला. मला माझ्या सोबत असलेल्या ताईने विचारलं "तुला तो डोंगर दिसतोय?" मी म्हणाले हो दिसतोय, "आपल्याला त्याच्या पलीकडे जायचंय "  हे ऐकून मी दोन मिनिट तिच्याकडे बघत राहिले; त्याच्या पलीकडे काही आहे ह्यावर माझा विश्वासच बसेना!!
             साधारण शहरी माणसाला रस्ता हा असा असतो आणि तो तसा नसला कि महानगर पालिकेच्या नावाने बोंब ठोकायची हे माहित असतं. पण ह्या जागेवरून अक्खा गाव ये जा करतो हे मला कर कोणी त्या आधी सांगितलं असतं तर मी त्या माणसाला नक्की वेड्यात काढला असता. कारण रस्ता ह्या परिभाषेत बसणारी ती गोष्टच नवती मूळी. मी जर चालत असते तर कसं चालू हा प्रश्न मी शेजारच्याला विचारला असता इतका तो "रस्ता" कठीण होता.
                टीवी मध्ये खतरो के खिलाडी वगरे कारेक्रम येतात न त्यांना ह्या गावातलं शेंबड पोरही धूळ चारील!! पण आमच्या संस्थेच्या driver लोकांना मानावं लागेल, चालायला सुद्धा कठीण वाटणाऱ्या रस्त्यावर हि मंडळी अक्खी गाडी हाकतात.  मी कितीही practice केली तरी clutch, gear आणि accelerator चं हे combination मला जमणारच नाही. आता ह्या दिव्या पलीकडे एक गाव पहुडलेला दिसतो. हि सगळी गावं मुख्य म्हणता यईल  अश्या रस्त्याच्या निदान २०-२५ किलोमीटर आत आहेत. आता ह्या वरून तुम्हाला कल्पना येईल कि साधी यष्टी सुद्धा ह्यांना दर्शन देत नाही.    
              आपण म्हणतो कि खेड्यातील लोक मुलींना शिकवत का नाहीत? तर त्याच हे उत्तर आहे, अहो रस्ताच नाही तर पोरगी शाळेत जाईल कशी? दोन बाजूला शेत, उंच गवत आणि मध्ये उंच सखल पायवाट, आणि भयाण शांतता… मला नाही वाटत मी जर त्या गावात असते तर माझ्या आई वडिलांनी मला बाहेर रोज जायची परवानगी दिली असती. जान है तो जहान है! नाही?
              ह्या गावात मला मी काम केलेल्या data मधल्या काजल, कोमल, अश्विनी इत्यादी इत्यादी मुली  भेटल्या. खर्या अर्थाने माझा data जिवंत झाला!! ह्याच मुलींना मी पुढे tablet शिकवला…….

         
          

Sunday 1 September 2013

दोषारोपण

             आज सहजच  माझ्या सोबतच्या एका जेष्ठ शिक्षिकांशी बोलण्याचा प्रसंग आला. विषय होता तोच चावून चोथा झालेला "येणारा lot कित्ती वाईट " हा lot म्हणजे मुलं. चाळीस ते पन्नास वयाच्या दरम्यान असलेल्या सगळ्या महाविद्यालयीन शिक्षकांना विचारा तुम्हाला हीच रड ऐकू येईल. ह्यांचा आरोप असा कि आजकाल मुल पाठांतर करून मार्क मिळवतात, त्यांची कसली म्हणून लायकी नाही, नाही तर आमच्या वेळेस आम्ही कित्ती अभ्यास करायचो तेव्हा कुठे first class मिळायचा, थोडक्यात आमची लायकी फार जास्त होती!!आणि आत्ता 'ह्या असल्या' मुलांना शिकवणं म्हणजे आम्ही 'लाख' मोलाची प्रतिभा वाया घालवण्या सारखं आहे.
           त्या बाईना मी बोलू दिलं , वेळी अनुमोदन पण दिलं ; म्हणजे मी बरेचदा असा करते, त्यांनी होतं काय कि माणूस आपल्या मनातलं सगळं बोलून जातो, त्याला असं  वाटत राहत कि समोरचा आपल्याच विचारांचा आहे,  अश्यात  आपल्याला त्या  माणसाची चांगली पारख करता येते.  बरं असो, तो काही आपला मुद्दा नाही, तर, त्या बोलता बोलता फारच उणीदुणी काढू लागल्या, "ह्या मुलांना विषयाच्या application बद्दल विचारा काही म्हणून येणार नाही", " पुढे M.Sc. ला गेल्यावर साधे ५०% मिळवणं कठीण होतं ह्यांना". मुलांचा नंबर झाल्यावर त्या कॉलेज आणि विद्यापीठाच्या कारभारा वर घसरल्या, कसा आम्हा शिक्षकांना त्रास आहे, कसं कोणीच आम्हाला सध्या सुविधा सुद्धा पुरवत नाही आणि तरी आम्ही इतकी वर्ष गपगुमाने काम करतोय इत्यादी इत्यादी. काही मुद्दे त्यातले बरोबर असतीलही कदाचित पण बाकी सर्व अतिशयोक्तीच होती. कारण त्यांच्याच सोबत काम करणाऱ्या अजून एका प्रध्यापिकांना मी इतकी ओरड करतांना कधी बघितलं नवतं. आणि बहुतांशी लोक ह्याच category मध्ये असतात.
       पण माझा ह्या सगळ्या senior प्राध्यापकांना प्रश्न आहे, मुलं वाईट आहेत हा त्यांचा दोष आहे का फक्त? आणि असतीलही तरी त्यांना सुधारण्याचा तुम्ही किती प्रयत्न केलाय? आज F.Y., S.Y. ला येणारी मुलं हि ज्या शिक्षण व्यवस्थेतून आली तीच, थोड्या फार फरकाने आमची म्हणजे माझ्या वयाच्या सगळ्यांची व्यवस्था होती.  मला कधीही हे  आठवत नाही कि माझ्या शाळेत किंवा महाविद्यालयीन शिक्षणात मला स्वतःला कधी विषयाची applications काय आहेत बरं? असा प्रश्न कोणत्या शिक्षकाने विचारला असेल, निदान ते शोधण्या साठी अमुक अमुक पुस्तक वाच म्हणून सांगितल असेल.
      ढोबळ मानाने येणारे विद्यार्थी हे थोड्या फार फरकाने  सगळे सारखे असतात, कधीही शिक्षकाला त्या मुलां पेक्षा जास्तच येत असतं, अपेक्षा तरी अशीच आहे. जरा मागे जाऊन शालेय शिक्षणाचा विचार करा, एखाद्या  सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याची गोष्ट घ्या, तो रोज शाळेत जातो, शिकतो मग परीक्षा असते, त्यात पुस्तकात धड्या मागचे प्रश्न आणि अजून काही असे माहितीतले प्रश्न येणार असतात, घरच्यांनी परीक्षेतले मार्क हा प्रतिष्ठेचा विषय बनवला असतो, आणि नाही  प्रतिष्ठेचा तरी अमुक अमुक मार्क मिळवण हि चांगला विद्यार्थी असण्याची निशाणी आहे असा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा होरा आहे. मग तो विद्यार्थी स्वतः किंवा classes च्या मदतीने "चांगले" मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत सहभागी होतो. एकदा ते मिळाले कि ते टिकवणे ओघाने आलेच, नाही तर प्रश्नांची सरबत्ती आणि टोमण्यांचा मारा असतोच.
          चला शाळेच्या विद्यार्थ्य कडून फार काही अपेक्षा नाही ठेवल्या तरी "इतकं  लिही म्हणजे पुरे!!! " हि विचारसरणी  सुद्धा ठीक आहे, पण आता शाळांची मुलांना पास करण्याची policy असते, आठवी परेंत पास करा म्हणे, माझी एक मैत्रीण एका शाळेत नोकरीला लागली होती तिथे मुलांनी लिहिलेल्या साफ चुकीच्या प्रश्नाला सुद्धा मार्क दे, वेळी स्वतः पेपर लिही!!! इथवर तिला तिच्या वरिष्ठांनी सांगितलं. ती सुद्धा बिचारी नोकरी चा प्रश्न आणि लहान म्हणून, मन मारून ते काम करत राहिली, मग सोडून निघून गेली. पण आमच्या सारख्या मुलांना ज्यांनी खरोखर कष्ट करून मार्क मिळवले आहेत असे मार्क देणं म्हणजे पाप केल्यागत वाटतं.  थोडक्यात "आपण पास होणार" हा message मुलां परेंत पोचला आहे, आता जर पाच सात वर्षे जुन्या पाठ करून लिहिण्याच्या सवयीला सुद्धा आपली व्यवस्था फाटा देत असेल तर मग application oriented शिक्षणाची तर बातच सोडा.
          पुढे व्यावसायिक शिक्षणा बद्दल मला माहित नाही पण नियमित science, Arts, commerce चे पेपर बघा, वर्षभर अभ्यास करू नका आणि शेवटी मागचे १० पेपर पाठ करा आणि भरगोस मार्क मिळवा असा फंडा आहे. काही महाभाग हे सुद्धा करत नाहीत!!  पण काही अंशी हि मुलं थोडा वेगळा approach देण्याच्या वयात असतात. हा विषय मी का शिकतोय? ह्याच उपयोग कुठे होतो?  असे प्रश्न त्यांना पडतात, आणि हि मुलं दिलेली उत्तर समजण्याच्या वयात असतात, मग ह्यांची उत्तर देण्याची जवाबदारी कुणाची? 
         शाळेच्या शिक्षकांबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण माझा स्वतःचा तिथे काम करण्याचा अजिबात अनुभव नाही त्यामुळे शिकवण्या खेरीज त्यांना अजून कार्यालयीन किती आणि कोणती कामं असतात हे मला मुळीच माहित नाही. वाचून फक्त माहित आहे कि महाविद्यालयीन शिक्षकांपेक्षा जास्तच असतात.
         मग आता आपले लाडके महाविद्यालीन शिक्षक (इथे मी सगळ्यांबद्दल बोलत नाही ) ज्यांना येणाऱ्या वाईट lot चा भारीच त्रास होतो त्यांच्यावर बोलू. एकतर ह्यांची मानसिकताच मूळी  दुषित असते, आपण करत असलेल्या कामाबद्दल आस्था आणि प्रेम हे बेडगी असतं. जात आणि धर्मावर मुलांमध्ये भेदभाव करणारे शिक्षक पाहून तर मला हादराच बसला. अश्या ह्या शिक्षकांनी, ज्यांनी मला सुद्धा शिकवलं आहे ;मला हे सांगाव कि एखाद्या topic वर काय नवीन माहिती मुलांना देता  येईल, जेणे करून त्यांचा विषयातला interest develop होईल असा विचार तुम्ही करता का हो? मला विद्यार्थी म्हणून विचारलं तर मी नाहीच म्हणेन.                      मी B.Sc.केलं  ह्यात मुलांचा interest develop करण्याचा , अभ्यास, वाचन करायला प्रवृत्त करायचा बराच  scope होता. मला क्वचित असा प्रसंग आठवतो जिथे शिक्षक मुलांच्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही हे reference books वाचा, हे journal वाचा, असे सांगणारे शिक्षक फारच विरळा. ह्या वर "मुलांना काय समजणार डोंबल " हा ह्यांचा शेरा. पण त्यांना समजणारी पुस्तक कोणती हे शिक्षक तेव्हाच  सांगेल जेव्हा त्यांचं स्वतःच वाचन असेल. हे लोक कोणे एके काळी केलेल्या आपल्या M.Sc. वरच खुश, आणि तेच किती उत्कृष्ठ शिक्षण म्हणून नवीन काहीही न वाचणारे!!
        महाविद्यालयात NAAC आणि ISO लावले खरे पण त्याचा मूळ  हेतू अजिबातच सध्या झाला नाही. ह्यात शिक्षकांनी research करण्यावर भर देण्यात आला आहे, आणि हि  गरज सुद्धा आहे.  मुद्दा असा कि संशोधनाच्या निमित्ताने शिक्षकाचं काही वाचन होईल आणि पर्यायाने त्याचा मुलांना फायदा होईल. पण ह्या संशोधनाचा जो बाजार चालू झाला आहे त्या बद्दल न बोललेलंच बरं. 
       वर्गात सगळ्या बौद्धिक स्थराची मुलं येतात, त्या पैकी सगळ्यांना समजेल असं शिकवणे आणि हुशार, मेहेनती मुलांच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारणे हि शिक्षकाची जवाबदारी आहे. शेवटी गरज निर्माण जोवर होत नाही मुलं सुद्धा काम करणार नाहीत "शेवटी ते तुमचेच विद्यार्थी नाही का?".
       तुम्ही असे छोटे छोटे projects द्या ज्यांनी मुलांना विषयाची applications शोधण्याची गरज पडेल, नुसता topic शिकवतांना अमुक अमुक ठिकाणी हे वापरतात हे सांगा, त्यांना वाचायला उदुक्त करा. फक्त syllabus वाढवून आमच्या डोक्याला कसा देवा ताप होतो हि रड बंद करा.
       ऐन शिक्षक दिनाच्या जवळ हे पोस्ट लिहितेय मी, पण हेतू काही तरी सुधार व्हावा हाच आहे. शेवटी
गुरु ब्रम्ह आणि विष्णू आहे असं श्लोक जरी म्हणत असला तरी देव चुकत नाही असं कोण म्हणतंय ?

Thursday 20 September 2012

निबंध

         अगदी शाळे पासून माझा आवडता प्रकार. मराठीच्या पेपर साठी बाकी तयारी सगळी करावी लागायची पण निबंधाची तयारी फार कधी करावीच लागली नाही. बाकी पेपर आठवून आठवून लिहायचे मी पण निबंधाची वेळ आली कि मी माझ्याच विश्वात!!!! त्यातही माझा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे "आत्मवृत्त" अगदी कश्याच पण आत्मवृत्त लिहिणे म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ!!! 
          फुशारक्या नाही मारत, मार्क पण मिळायचे!! माझी आणि निबंधाची गट्टी कधी जमली असा विचार करायला गेले तर ऋणानुबंध जुना असल्याचं लक्षात आलं. घरी आई-बाबांनी वाचनाची आवड लावली, काही नाही तरी माणसाने रोजचा पेपर तरी वाचायला हवा असं त्यांचं धोरण. "अगं शब्दसंग्रह वाढतो , वाक्यरचना सुधारते" ह्या वाक्याचा अर्थ तेव्हा समजला नवता. पण चांगली गोष्ट हि कि मी शहाण्या मुली सारखं ऐकलं आणि फायदाच झाला.  मग एका मागून एक पुस्तकं माझ्या संग्रही आली आणि माझी मैत्री झाली त्यांच्याशी. हि पुस्तकं खरोखर तुम्हाला एका वेगळ्या विश्वात  नेतात , कल्पनाशक्ती नावाची जी hidden power आपल्यात असते ती जागृत करतात. पण एक पुस्तक एकदाच वाचू शकते मी, परत परत त्या विश्वात मला जायला आवडत नाही. मग वाटू लागल कि एकदाच काय ती "सफर" घडवणारी हि माझी दोस्त मंडळी काही फार उपयोगी पडत नाहीयेत. हि
कथा मी  अगदी  चौथी पाचवीत असतांनाची, त्या नंतर कदाचित हे "निबंध" महाशय आमच्या परिचयात आले.
          पहिला निबंध वगरे काही मला आठवत नाही पण चौथीच्या scholorship च्या पुस्तकातल्या म्हणी आणि वाक्प्रचार वापरून लिहिला होता मी तो. आम्हाला निबंधाची वही मिळायची घरी, बाई शाळेत विषय द्याच्या आणि घरी लिहायला सांगायच्या. हा programme बहुतेक रविवारी होत असावा कारण मी नंतर घरी सगळ्यांचं डोकं खात असे; अगदी पाहुणे जरी आले असतील तर त्यांना सुद्धा सोडत नसे,  मी "कित्ती" अभ्यासू आहे हे दाखवण्याचा हा माझा फंडा होता.  पण माझा निबंध चांगला जमत असावा कारण शेरा सुद्धा "छान" चा मिळायचा.
         पुढे निबंध पेपरात मार्कांचं लेणं ल्यावून आला आणि जास्तच भाव खावू लागला, मग खास त्यासाठी पुस्तकं वगरे मी धुंडाळू लागले, इतर पुस्तकं माझ्या गाठी जमा होत होती. आत्ता वाटू लागलं कि लहानपणचे पुस्तक मित्र अजूनही डोक्यात घर करू आहेत, कधीतरी त्यातली एखादी छोटी गोष्ट किंव्वा प्रसंग आठवायचा आणि लिहितांना मदत करायचा.  खरोखर मार्कांच्या चौकटीत आपला निबंध कसा बसेल? वगरे विचार करून मी निबंध लिहू लागले. थोडीफार चौकट साधली सुद्धा!!!
          पण मग त्यातही आपली काही खास आवड निवड आहे असं जाणवू लागलं, असं नको तसं लिहावं, हे नको तेच लिहावं वगैरे. मला जर कुणी फक्त निबंधा वरच परीक्षा आहे असं सांगितलं असतं न तर ती परीक्षा मी निक्षून दिली असती!!!!
           काही दिवसांनी माझी ओळख झाली ती निबंध स्पर्धा नावाच्या मला भाग घ्याव्या वाटणाऱ्या स्पर्धेशी. कारण काये कि मला मुळात स्पर्धा वगरे काही आवडत नाही, त्यात त्या असायच्या चित्रकला, गायन वगरे माझ्या सुप्त गुणांच्या, माझी आपली धडपड कि सुप्त गुण सुप्तच राहावे!!! उगाच प्रदर्शन कशाला? पण निबंध स्पर्धा हा माझा जिव्हाळ्याचा विषय बनला, शाळेत सुद्धा त्यात भाग घेतला, नाही म्हणायला उत्तेजनार्थ, तिसरा वगरे क्रमांक नशिबी आला पण आपल्या आवडीची गोष्टं करतोय ह्यातच समाधान!!!
          पुढे शिक्षण घेण्यासाठी मी R.Y.K. चं दार ठोठावलं, त्यांनी सुद्धा आनंदानी आत येऊ दिलं. इथे आम्ही Science चे विद्यार्थी असल्याने "ह्यांना काय साहित्याची समज?" असं  "गाढवाला गुळाची चव काय?" style मध्ये आमच्याकडे पहिलं  गेलं. पण मी बिचारी गरीब बापुडी इथे सुद्धा  निबंध स्पर्धेला जाऊन बसले, आणि पहिला वगरे मिळवला (हि बंडल नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी)
त्या स्पर्धे साठी खरच कष्ट घेतले होते. पण Science side घेतली आणि माझा माझ्या आवडत्या निबंध  प्रकाराशी  संबंध थोडा कमी झाला, संपलाच जवळ जवळ. मग M.Sc. मध्ये तर नावंच नाही.
          तरी एक किडा असतो तुमच्यात तो काही शांत बसू देत नाही सारखं वाटत होतं "लिहायचच नाही म्हणजे काय?" मग मला हा मार्ग सापडला आणि मी लिहिती झाले!!! आता तयारी नाही करत न कोणी तपासून मार्क देत पण मी लिहिते स्वतः साठी.
          मला आज निबंधाची आठवण का आली? मी शिकवत असलेल्या  कॉलेज मध्ये आज निबंध स्पर्धा आहे आणि मी स्पर्धा चालू असलेल्या वर्गात बसले आहे, निबंधाचा विचार करत!!! 

Monday 13 August 2012

Morning Glory

              फेब्रुवारी , मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि आता ऑगस्ट; महिने मोजतेय मी. मागची  पोस्ट
 लिहून इतके दिवस झाले, नाही म्हणायला माझ्या काही लाडक्या (मोजक्या) वाचकांना आठवण झाली "लिहित का नाहीस गं हल्ली?" असे गोड प्रश्न त्यांनी विचारले, पण माझ्यातल्या लेखकाकडे
त्यांची  उत्तरं  न्हवती; कदाचित लेखकाला डोकावायला वेळच न्हवता.
               पण कधी - कधी काही गोष्टी अश्या घडतात कि ज्या वेळ काढायला भाग पडतात. तुमच्या आयुष्यात गोष्टी ठीक-ठाक चालू आहेत; अगदी हव्या तश्या नाहीत पण अगदीच नकोश्या पण नाही पण तरी......
              एका point ला तर मला असं  वाटायला लागल होत कि माझा  ब्लॉग  हा फक्त interview मध्ये सांगायची गोष्ट झालाय "I write a blog in marathi" , But am I "Writing?" it- No
काहीतरी मागे खेचत होतं मला, किंवा काही सापडत न्हवतं मनाजोगतं. रोज सकाळी कामावर  जायची घाई
 मग आल्यावर थकवा, झोप  आणि मग पुन्हा दुसरा दिवस, पण दिवस घालवणे आणि 
साजरे करणे ह्यात फरक असतो, मी घालवत होते!!
             पण देव काही तुमची पाठ सोडत नाही तुमच्यातला कलाकार नाही कलाकार तरी रसिक झोपू नये ह्याची तो पुरेपूर काळजी घेतो, मग ह्या न त्या कारणाने तुम्ही जागे होता आणि त्याची आज्ञा  पाळता.
            परवा सकाळी मला ह्या गोष्टीचा साक्षात्कार झाला!! सकाळची वेळ तयारीला  लागावं  असा विचार करत असतांनाच मला एक चमत्कार दिसला!! हो तो चमत्कारच होता . माझ्या दारा  समोरच्या  झाडाला एक कोळ्याच जाळ आणि त्यात सुंदर हिऱ्यांचा हार बनलेला, मी माझा camera आणला  आणि  लागले कामाला...
           




                                            
पावसाच्या सरींनी आणलेली हि सुंदर भेट मला तरी जागं करून गेलीये.


Friday 3 February 2012

इलेक्शनने ना भोSSSSSS

         आन मग काय तर...इलेक्शन चा काळ हे!!! कार्यकर्त्यांची किती 
पळापळ  होती!!! पत्रकं वाटा, घरोघरी जा, माद्दार यादीत नाव आहे का 
नै ते तपासा, नसल तर त्यानला नाव टाकायची घाई करा लई कामं 
असत्यात. त्यात ह्या टायमाला इलेक्शन सना-वारा च्या जवळ पास
आले, मग तर इचारू नका राव. गणपती म्हनू नका, नवरात्र म्हनू नका, दसरा म्हनू नका, दिवाळी म्हनू नका रांगच लागली ना सनांची. 
      गणपती च्या टायमाला तर "सायबांचे " poster लावता लावता दमून गेलो आमी, गणपती बसायच्या दिवसा पासून सुरु होऊन दीड, पाच, सात आनी मग धा दिवसांच्या परेंत "गणेश भक्तांचे स्वागत आहे", "गणपती बाप्पा मोरया" आशे किती तरी फलक लावावे लागले
सोबत "साहेब" नै तर "ताई" चा हात जोडून फोटो असलाच पाहिजेल,
आन मग आम्ही नै का "शुभेच्छुक", नाहीतर "कार्यकर्ते" म्हनून 
असतो, लई भारी फोटो काढला हुता, "passport size"!!!!  
      मंडळाला सायबांची किती मदत झाली, भारी भारी कारेक्रम केले
एक मस्त "लिटील च्याम्प फेम", "इंडिअन आयडल फेम" कलाकार
आलाच म्हनून समजा, पब्लिक  खुश आन आपन बी. दांडिया हा लई महत्वाचा event व्हता. दांडिया येओ न येओ गल्लीतल्या आया -बाया आल्या हुत्या ना, DJ लावला मस्त
 धमाल केली,रावन जाळायची आर्डर आली, तशे आमी परत कामाला....मस्त म्होटा रावन केला तयार, वार्डात चिल्ली-पिल्ली खुश!!!(सोबत माय-बाप पन..) तवा पन यक कारेक्रेम केला, तो पन पब्लिक साठी फुकट. आन मग काय तर, जनतेचे शेवक व्हायासाठी करा लागते. 
        ह्या येळेची दिवाळी पण लई जोरात झाली "ना नफा ना तोटा"
 तत्वावर फटाके विकले ना आमी. परत पत्रक वाटली दिवाळीची कविता
केली होती लई भारी (आपल्याला नाही समजली पन शेवटी दिवाळी च्या शुभेछा होत्या म्हनून.... ). वार्डात बायकांना घरोघरी दिवे वाटायला पाठवलं न, येका येका पिशवीत चार चार दिवे!!!! तवा भाऊ सगळ्या घरी जाऊन शुभेछा देऊन आले. 
        लोका साठी "दिवाळी दसरा आनी हात पाय पसरा " असते पन
 आपली नाही ना राव, कसं हे, मग नाताळ आनी "New Year" नाही का येत. "नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा"!!! लागले न बोर्ड!!!!!. नवीन वर्षाच्या निमित्तानी तर मग काई इचारू नका "New Year Party" जोरात परत म्होटा कलाकार आला अनि पब्लिक खुश 
करून गेला. 
      आता बोलाल संपलं नाही का पुराण, हे कई पुराण आहे का??? (हि गाथा हे), नवीन वर्षाचा बहर कुठं संपला अजून? पत्रक राहिली कि वाटायची!!!! आन आता नवीन वर्षानिमित्त "दिनदर्शिका" घरोघरी वाटली, एक काका म्हनले "आरे किती देता कॅलेंडर, कुठे कुठे लाऊ?" आपण बोललो "काका भिंती कमी हायेत का घराला?,परतेक भिंतीवर एक, तारीख विसरलीच नाही पायजेल". काका हसले...
    मग "तीळ गुळ घ्या अनि गोड गोड बोला" अहो आपली संक्रांत.
आपल्यावर  संक्रांत येऊ नये म्हनून भाऊंनी लई तयारी केली, घरोघरी 
पत्रक सोबत हलव्याची अनि तिळाची एक पुडी!! मग वहिनींच्या 
डोक्यात आयडिया आली म्हणल्या "हळदी कुंकवाचा" कारेक्रम करू.
पन काय हे कि आमच्या वार्डात कामावर जाणाऱ्या बायका खूप!!! मग कस जमनार ना, तवा हळदी कुंकवाचा करंडा अनि वान 
घरपोच!!!!(सोबत पत्रक). भाऊ बोलले अजून काहीतरी करू, मग 
काय केलं???? आहो एक पुस्तिका बनवली त्यात सारे म्हत्वाचे नंबर, 
छोटी "डिरेक्टरी"!!!!! 
    तवर उमेदवार यादी जाहीर झाली....आन काय सांगू साऱ्या कष्टाचं
चीज झालं.....भाऊंना पक्षाचं  तिकीट जाहीर झालं!!!!!
भाऊ जाम खुश झाले.....त्या दिशी बैठक घेऊन भाऊ म्हणले तुम्हा 
कार्यकर्त्या मुळे हे शक्य झालं आता अजून जोमानं कामाला लागा 
आता इलेक्शन जिंकायचं.
      काल पासून "Laptop" घेऊन घरोघरी फिरतोय, लोकांना मतदानाची चिट्टी घरपोच द्याची अशी आर्डर हे!!!!!
लोकांनो भाऊ इतके कष्ट कारायालेत जरा तुम्हीबी करा......
मतदानाला जा...............